उत्तर महाराष्ट्र

नाशिक : शिवसृष्टी पूर्ण होईपर्यंत निधीची कमतरता पडू देणार नाही – अजित पवार

गणेश सोनवणे
 येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
येवला मतदारसंघात विकासाची गंगा भुजबळ साहेबांनी निर्माण केली. त्यांच्याच संकल्पनेतून, पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास डोळ्यासमोर मांडणारी शिवसृष्टी येवल्यात उभी राहत आहे. या शिवसृष्टीतून छत्रपती शिवाजी महाराज यांचे साहस, शौर्य, पराक्रम, त्यांच्या कल्याणकारी राज्याची प्रतिकृती सर्वांसमोर मांडली जाणार असून शिवसृष्टीचे काम पूर्ण होईपर्यंत कुठलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केले.
येवला शिवसृष्टी प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते तर मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र असून त्यांच्या विचारांवर राज्य काम करत आहे. मात्र काही लोकांकडून विघ्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोककल्याणकारी राज्य कसे असावे याचे उत्तम उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज यांनी ३५० वर्षांपूर्वी दाखवून दिले. त्या छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवसृष्टी येवल्यात उभी राहत आहे. आजचा हा दिवस येवलेकरांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस असून शिवसृष्टी प्रकल्पास कुठलाही निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.
पवार म्हणाले की, गेली दोन वर्षं महाविकास आघाडी सरकारने कोरोनाबाधित नागरिकांना अडचणीतून बाहेर काढले. माणूस जगविणे याला प्रमुख प्राधान्य देऊन काम केलं. त्यामुळे इतर विकास कामांना थोडा कमी निधी उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, लोकांच्या मनामध्ये विष कालविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आत्ताच काही लोकांना भोंगे का आठवत आहे. कशा करता लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जे पवार साहेब सर्व समाजाच्या हिताच्या दृष्टीने काम करत आहे. त्यांना जातीयवादी ठरविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगत बोलणाऱ्याचे वय जेवढे आहे, तेवढी पवार साहेबांची राजकिय कारकीर्द असल्याचा चिमटा त्यांनी राज ठाकरे यांना काढला.
कधी एखादा साखर कारखाना, एखादी शिक्षण संस्था नाही इतकेच नव्हे साधी सोसायटी देखील या पठयाने काढली नाही असा चिमटा राज ठाकरे यांना नाव/ न घेता अजित पवार यांनी लगावला. महागाई वाढत आहे, त्याबद्दल तर काहीच बोलत नाही. ते जेव्हा बोलतात तेव्हा सगळी नौटंकी करतात ते नकलाकार आहे की भाषणकार आहे हेच कळत नाही. उन्हात सभा घेण्याचे कष्ट राज ठाकरे यांनी कधीच घेतले नाही. धुडगूस घालायला डोकं लागत नाही. लोकांना बनविण्याचे, फसविण्याचे काम कोणी करू नये असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी अजान सुरू असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपले भाषण थांबविले. ही आपली संस्कृती असल्याचे सांगत एकमेकांमध्ये शत्रुत्व निर्माण करून कोणाचेही भलं होणार नाही. योगी सरकारने केवळ मशिदींवरील नाही तर मंदिरावरील भोंगे देखील काढले आहे. ही सत्यता नागरिकांनी जाणून घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे राज्य आहे. त्यामुळे आपल्याला जातीय सलोखा ठेवावाच लागेल असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT