उत्तर महाराष्ट्र

Nashik : त्र्यंबक, इगतपुरीत सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात गुरुवारी (दि. १५) सलग दुसऱ्या दिवशी बेमोसमी पावसाने हजेरी लावली. नाशिक शहर व परिसरात दिवसभर ढगाळ हवामान असल्याने उकाड्यात प्रचंड वाढ झाली होती. दरम्यान, दोन दिवसांच्या पावसाने झालेल्या नुकसानीची माहिती गोळा करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्याच्या हवामानावर झाला आहे. गत चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झाले असून, बुधवारी (दि. १४) नाशिक शहरासह जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांत बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. त्यातच सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यातील तालुक्यांमध्ये बेमोसमी पावसाने हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह पेठ आणि सुरगाण्यात काही गावांमध्ये हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. त्यामुळे स्थानिक जनजीवन विस्कळीत झाले आहे.

जिल्ह्यात दोन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे काढणीला आलेली द्राक्षे, भात, टोमॅटोसह अन्य पिके तसेच भाजीपाला धोक्यात आला आहे. रब्बीची पिके असलेल्या गहू, मका आणि हरभऱ्यालाही फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगोदरच खरिपाचा मार झेलणाऱ्या शेतकऱ्यांचा पाय अधिक खोलात गेला आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने नुकसानीची माहिती गोळा करण्याचे आदेश तालुका स्तरावरील यंत्रणांना दिले आहेत.

SCROLL FOR NEXT