नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील 63 कनिष्ठ महाविद्यालयांतील इयत्ता अकरावीच्या 26 हजार 480 जागांसाठी ऑनलाइन केंद्रिभूत पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबवण्यात येत आहे. या प्रवेशप्रक्रियेंतर्गत शुक्रवारी (दि.12) दुसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, रविवार (दि.14), सोमवार (दि.15), मंगळवार (दि.16) सलग तीन दिवस सुट्या आल्याने दुसरी फेरी रेंगाळल्याचे चित्र बघावयास मिळाले. या फेरीत मंगळवारी (दि.16) सायंकाळपर्यंत 1 हजार 571 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.
इयत्ता अकरावीच्या केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेंतर्गत पहिल्या गुणवत्ता यादीसाठी 12 हजार 623 संधी देण्यात आली होती. त्यापैकी 8 हजार 183 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले होते. पहिल्या फेरीअंती 16 हजार 866 जागा रिक्त होत्या. दुसर्या गुणवत्ता यादीसाठी तब्बल 8 हजार 180 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या यादीसाठी 4 हजार 36 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 571 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. दरम्यान, दुसर्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चितीसाठी बुधवारी (दि.17) अखेरची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना सायंकाळी 6 पर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. त्यानंतर तिसर्या प्रवेशफेरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. गुरुवारी (दि.18) तिसर्या प्रवेश फेरीच्या रिक्त जागांचा अहवाल प्रसिद्ध केला जाणार आहे. तर पुढील आठवड्यात या फेरीसाठी गुणवत्ता यादी जाहीर होण्याची चिन्हे आहेत.
द्विलक्षी प्रवेशाचे नियोजन : द्विलक्षी विषय प्रवेशासाठी रविवार (दि.14)पासून प्रक्रिया राबविण्यात येत असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन पसंती देणे बंधनकारक आहे. बुधवारी (दि.17) प्रवेश निश्चितीची मुदत संपणार आहे. त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयांकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. नियमित फेर्यांसोबत समांतर 'द्विलक्षी'ची प्रवेशप्रक्रिया सुरू राहणार आहे.