उत्तर महाराष्ट्र

नाशिक : स्वयंअध्ययनातून नायब तहसीलदार पदाला गवसणी

अंजली राऊत

नाशिक (मेशी) : पुढारी वृत्तसेवा
मोठ्या पगाराची नोकरी असताना केवळ प्रशासकीय सेवेची ओढ निर्माण झाली अन् या ध्येयप्राप्तीसाठी एकलव्यासारखी साधना करत येथील भूषण चिंतामण बोरसे याने नायब तहसीलदार पदाला गवसणी घातली. सॉफ्टवेअर इंजिनिअर भूषणचे हे यश ग्रामीण भागातील मुलांसाठी प्रेरणादायी आहे.

भूषणचे मूळ गाव मेशी असले तरी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सिन्नर, मानूर, कळवण असे फिरतीवर झाले. सध्या बोरसे कुटुंबीय देवळा येथे वास्तव्याला आहे. गतवर्षी झालेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत भूषणने राज्यात 120 वा क्रमांक मिळवला, तर इतर मागासवर्ग प्रवर्गात नायब तहसीलदार म्हणून तो अकरावा आहे. कोणताही कोचिंग क्लास न लावता रोज दहा-अकरा तास अभ्यास करून अर्थात स्वयंअध्ययनातून तिसर्‍याच प्रयत्नात त्याने हे यश मिळवले. सिंहगड कॉलेज (पुणे) येथे इंजिनिअरिंगची (इटीसी) पदवी मिळवत सॉफ्टवेअर कंपनीत कामास सुरुवात केली. परंतु, प्रशासनातील सेवेची आवड निर्माण झाल्याने दोन वर्षांनंतर सदर जॉब सोडून पूर्ण वेळ त्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. अभ्यासिकेत दहा-अकरा तास अभ्यास, वर्तमानपत्रातील टिपणे, क्रमिक पुस्तकांचे वाचन यातून हा यशाचा मार्ग गेल्याचे भूषणने सांगितले. वडील चिंतामण हे प्राथमिक शिक्षक, तर आई आशा या गृहिणी आहेत.

आत्मविश्वास, अपार कष्टाची तयारी, कुटुंबाची साथ आणि स्वयंअध्ययन यातून हे यश मिळाले. ग्रामीण भागातील मुलांनी न्यूनगंड न बाळगता प्रामाणिक प्रयत्न करावेत. वेळेचा सदुपयोग करावा. – भूषण बोरसे, देवळा (मेशी).

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT