नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक, त्र्यंबकेश्वर भागात बुधवारी (दि.१४) बेमोसमी पावसाने हजेरी लावली. साडेचारच्या सुमारास नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागांत बेमोसमी पावसाच्या अवक़ृपेने नागरिकांना झोडपून काढले. नाशिकसह त्र्यंंबकेश्वर, गिरणारे भागात जोरदार पाऊस झाला. पाऊस सुरू होताच वीजही गायब झाली. त्यामुळे शहर अंधारात होते. बेमोसमी पावसामुळे रब्बी पिकांंचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
अवकाळी पावसामुळे शेतपिकांवर मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या रोगांचा परिणाम होतो. परिणामी शेतकर्याला वारंवार औषध फवारणी करावी लागते. इतके करूनही पीक हाताला येईल याची काहीच शाश्वती नसते. त्यामुळे आगोदरच आतबट्ट्यात असलेला शेतकरी आणखीच आर्थिक अडचणीत ढकलला जात आहे. यंदा दोन महिने अतिवृष्टी सततच्या पावसाने चारशे कोटींचे नुकसान झाले होते. त्या नुकसानीची भरपाई मिळत नाही तोच आता पुन्हा रब्बी पिकांच्या नुकासानीची भर पडण्याची शक्यता आहे. आजच्या पावसामुळे दोन तास जनजीवन विस्कळीत झाले. थंडी पुन्हा वाढली. स्वेटरसह रेनकोटही घालून फिरण्याची वेळ आली.