उत्तर महाराष्ट्र

नाशिक : पर्यावरण महोत्सव रंगला : प्रदर्शन, आरोग्य शिबिरालाही उत्स्फूर्त प्रतिसाद

अंजली राऊत

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
शहरामध्ये प्रथमच घंटागाडी सफाई कामगारांच्या वतीने आयोजित पर्यावरण महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक, नाटककार व पर्यावरणस्नेही उद्योजक लोकेश शेवडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आरोग्य शिबिर, पर्यावरणप्रेमींचा सत्कार व परिसंवाद ठेवण्यात आले होते. तसेच पर्यावरणाशी संबंधित वस्तूंचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रोटरी क्लब नाशिक व नाशिक महानगरपालिका श्रमिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड व रोटरी क्लबच्या अध्यक्षा श्रीया कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत सफाई कामगारांसाठी आरोग्य शिबिर पार पडले. यात रोटरी क्लबच्या वतीने हर्षद आढाव, विनय कुलकर्णी, अंधा महाजन, अस्मिता ढोकरे, शिल्पा दयानंद, नागेश मदनूरकर, चंद्रकांत संकलेचा, महेश मंगळूरकर, रचना चिंधडे, अंजली कुलकर्णी, सुनील संकलेचा, अनिता नेहेरे आदींनी तपासणी केली. यावेळी रस्त्यात हृदयविकाराचा झटका आल्यास कोणती काळजी घ्यावी, याबाबत रोटरीच्या वतीने प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील प्रसिद्ध भारूडकार चंदाबाई तिवाडी होत्या. संघटनेचे अध्यक्ष दीपक भालेराव, स्वागताध्यक्ष पद्माकर इंगळे यांचे यावेळी भाषण झाले. निमंत्रक महादेव खुडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते शहरात पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या संदीप चव्हाण यांनी किचन गार्डन क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल, संतोष शिंदे यांचा बायोगॅस प्रकल्पाबद्दल, पुष्पा भोये यांचा नागली प्रक्रिया उद्योग, नमुना दळवी, अनुसया पवार यांचा महुआ सर्फेस क्लीनर, कडी महाले यांनी सरिता बीज बॅक तसेच निशिकांत पगारे यांनी गोदावरी गटारीकरण विरोधी मंचाच्या माध्यमातून केलेल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यानंतर अध्यक्षा चंदाबाई तिवाडी यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत भारूड सादर केले. दुसर्‍या सत्रात 'पर्यावरणस्नेही शहर-संकल्पना व आव्हाने' या विषयावरील परिसंवाद डॉ. मिलिंद वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी सचिन मालेगावकर, यू. के. आहिरे, संतोष जाधव, भिला ठाकरे यांनी विचार व्यक्त केले. नाशिक महानगरपालिका श्रमिक संघाचे अध्यक्ष दीपक भालेराव यांनी हा महोत्सव मुंबईमध्ये घेण्याची घोषणा केली. कार्यक्रमासाठी कैलास मोरे, लोटन मराठे, नितीन सोनकांबळे, रवि पगारे, नितीन शिराळ, सुरेश गायकवाड, पूनमचंद शिंदे, मारुती सोळसे, विजय गांगुर्डे, सचिन आल्हाट आदींनी परिश्रम घेतले.

ज्या कामगारांच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे. ज्यांना किमान सुविधांसाठी कायम संघर्ष करावा लागतो, अशा सफाई कामगारांनी शहरातील नागरिकांच्या व्यापक हितासाठी हा महोत्सव भरवून या महोत्सवाद्वारे नागरिकांना एक आगळा संदेश दिला आहे, ही खूप कौतुकास्पद बाब आहे. – लोकेश शेवडे, लेखक, पर्यावरणस्नेही उद्योजक.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT