उत्तर महाराष्ट्र

नाशिक महापालिकेच्या शाळा होणार स्मार्ट अन् अ‍ॅक्टिव्ह, सातशे क्लासरूम होणार डिजिटल

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून स्मार्ट स्कूल संकल्पना राबविली जाणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या 89 शाळांमधील सुमारे सातशे क्लासरूम डिजिटल करण्यात येणार असून, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब किंवा लॅपटॉप देऊन धडे देण्याचे नियोजन सुरू आहे. आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने 89 प्राथमिक व 13 माध्यमिक अशा एकूण 102 शाळा चालविल्या जातात. खासगी शाळांमध्ये मिळणार्‍या अद्ययावत सुविधा तसेच दर्जेदार शिक्षणामुळे मनपा शाळेकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपल्याच शाळा स्मार्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले जात आहे. या शाळा स्मार्ट करण्यासाठी दिल्लीच्या धर्तीवर स्मार्ट होणार आहे.

स्मार्ट शाळांच्या माध्यमातून शैक्षणिक दर्जा सुधारणे, विविध तंत्रांचा वापर करून मुलांना उत्तम दर्जाचे आधुनिक पद्धतीचे शिक्षण देणे, शिक्षकांना स्मार्ट क्लास रूमच्या माध्यमातून परस्पर संवादी तंत्रे, मल्टिमीडिया सामग्री वापरण्याचे प्रशिक्षण देऊन सक्षम केले जात आहे. यासाठी त्यांच्या हातात थेट टॅब किंवा लॅपटॉप दिला जाणार आहे. या शाळांमध्ये ई-बुक्स, प्रोजेक्टर, डिजिटल बोर्ड अशा सुविधा असणार आहेत. त्यासाठी महापालिकेत ई-लर्निंग सेंटर उभारले जाणार आहे.

मनपाची महत्त्वाकांक्षी स्मार्ट स्कूल योजना आता स्मार्ट सिटीच्या माध्यमातून राबविण्याचे आदेश आयुक्त रमेश पवार यांनी दिले आहेत. त्यानुसार मनपा पाहणी करून प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे. या अहवालावर संचालक मंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाहीला प्रारंभ होईल.
– सुमंत मोरे, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT