नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहरात कोरोना प्रादुर्भाव अद्याप नसला तरी सावधानता म्हणून महापालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज असून, केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचनेनुसार मनपाने आढावा घेत अधिकारी कर्मचार्यांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. महापालिकेने कोरोनासंदर्भात दुसर्या आणि तिसर्या लाटेसाठी केलेल्या सुविधांचा आढावा घेत सतर्कतेच्या सूचना केल्या.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि.25) केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने देशातील एक हजार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींशी तयारीबाबत आढावा बैठक घेत माहिती घेतली. कोविडसंदर्भात भारतात कोणत्याही प्रकारची भीती नाही. मात्र, तयारी आणि नियोजन करण्याच्या सूचना केंद्र शासनाने केल्या आहेत. त्या अनुषंगाने नाशिक महापालिकेने सज्जता ठेवली आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी येणार्या रुग्णांची चाचणी करण्यात येत आहे. प्रत्येक केंद्रांवर चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. परदेशातून येणार्या नागरिकांचे जिनोम सिक्वेन्सदेखील केले जाणार असून, कोविड काळात महापालिकेने आपले बिटको आणि डॉ. झाकिर हुसेन हे रुग्णालय कोविड म्हणून घोषित केले होते. रुग्णांची संख्या झपाट्याने घटल्यानंतर या रुग्णालयात नियमित रुग्णसेवा वर्षभरापासून सुरू झाली आहे.
शहरात 96 टक्के लसीकरण
नाशिक शहरात 18 ते 44 वयोगटांत दोन डोस घेतलेल्यांची संख्या 76 टक्के इतकी आहे. 40 वयोगटापेक्षा अधिक वय असलेल्या व दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 81 टक्के आहे. 15 ते 18 वयोगटातील 51 टक्के युवकांनी दोन डोस घेतले आहेत. 12 ते 14 वयोगटात दोन डोस घेणार्यांचे प्रमाण 65 टक्के इतके आहे. शहरात 27 लाख 27 हजार 295 डोस देण्यात आले असून, सरासरी 96 टक्के लसीकरण झाले आहे.
कोविड पार्श्वभूमीवर मनपाची तयारी
* एकूण उपलब्ध असलेले बेड – 12,500
* महापालिका रुग्णालयांमधील बेड – 800
* शहरी आरोग्य केंद्रांची संख्या – 30
* ऑक्सिजन क्षमता – 146 मे. टन
* ड्युरा सिलिंडरची संख्या – 19
* ऑक्सिजन सिलिंडरची संख्या- 3,060
* ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर – 1,400