उत्तर महाराष्ट्र

नाशिक : महाश्रामणेर रॅलीतून विश्वशांतीचा संदेश

गणेश सोनवणे

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा

अखिल भारतीय समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आयोजित महाबौद्ध धम्ममेळावा आणि महाश्रामणेर शिबिरानिमित्त बुधवारी (दि. २८) काढण्यात आलेल्या रॅलीत १ हजार उपासक व श्रामणेर यांची उपस्थिती होती. गोल्फ क्लब मैदानापासून रॅलीला प्रारंभ झाला, तर म्हसरूळ येथे समारोप करण्यात आला.

महाश्रामणेर शिबिरानिमित्त ईदगाह मैदानापासून सुरू झालेली ही रॅली एमजी रोड, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, पेठरोड मार्गे म्हसरूळ येथे आली. म्हसरूळ येथील बौद्ध राजविहारात या रॅलीचा समारोप झाला. दरम्यान, शहरातील विविध ठिकाणी या रॅलीत सहभागी उपासक व श्रामणेरांचे स्वागत करण्यात आले. मिरवणूक मार्गावर फुलांचा सडा टाकून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मिरवणुकीमध्ये भन्ते नागसेन, भन्ते धम्मरत्न, भन्ते बोधीपाल, भन्ते महामोगलान, भन्ते सारीपुत्र, भन्ते कौटीण्य आदी सहभागी झाले होते. रॅलीला संबोधित करताना धम्म बोधिपाल म्हणाले की, नाशिक शहरात त्रिरश्मी लेणी असून, या ठिकाणी आजही हजारो बौद्ध धम्म अनुयायी या ठिकाणी दर्शनाला जातात. विज्ञानवादी धम्माचा प्रचार प्रसार व्हावा, यासाठी या महाश्रामणेर शिबिराचे आयोजन केले आहे, असेही ते म्हणाले. याप्रसंगी भन्ते धम्मरत्न म्हणाले की, विश्वाला शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांच्या शिकवणीची आज समाजाला गरज आहे. नव्या पिढीला सुसंस्कारी करण्यासाठी या महाश्रामणेर शिबिराचा उपयोग होत आहे, असेही ते म्हणाले.

या रॅलीत सर्वांत पुढे भगवान गौतम बुद्धांचा पुतळा एका रथावर ठेवण्यात आला होता, तर त्यामागील रथावर भगवान बुद्धांचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सजीव देखावा, मग महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा सजीव देखावा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा सजीव देखावा होता. हे देखावे सर्वांचेच आकर्षण ठरले. त्या पाठोपाठ १ हजार धम्म उपासक आणि श्रामणेर हातात पंचशील झेंड्याचे प्रतीक असलेल्या छत्री घेऊन रॅलीत पायी सहभागी झाले होते. बुद्ध आणि भीमगीते लावण्यात आल्याने वातावरण निर्मिती होऊन नागरिकांचे लक्ष वेधले जात होते.

तसेच या रॅलीत कार्यक्रमाचे आयोजक व बीएमए ग्रुपचे अध्यक्ष मोहन आढांगळे, रमेश बनसोड, प्रदीप पोळ, राहुल बच्छाव, के. के. बच्छाव, गुणवंत वाघ, धीरज जाधव, रत्नमाला लोंढे, बाळासाहेब शिरसाठ, अशोक गवई, नितीन मोरे, अरुण काशीद, शिवाजी गायकवाड, वाय. डी. लोखंडे, डी. एम. वाकळे अशोक गांगुर्डे, संदेश पगारे, सोमनाथ शार्दुल, संजय नेटावदे आदींसह अखिल भारतीय समता सैनिक दलाचे व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT