उत्तर महाराष्ट्र

Nashik : ‘स्मार्ट स्कूल’बाबत मनपाचे वरातीमागून घोडे

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खासगी शाळांच्या स्पर्धेत मागे पडलेल्या नाशिक महापालिकेच्या शाळा स्मार्ट सिटीच्या मदतीने आधुनिक आणि स्मार्ट करण्याचा निर्णय अजूनही थंड बस्त्यातच आहे. वर्षे उलटूनदेखील या कामांना गती तर सोडाच, पण शाळांची डागडुजी करण्यातही मनपा सपशेल अपयशी ठरली आहे. आता शाळा सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने स्मार्ट स्कूलचे काम करणार असल्याचे मनपाकडून सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात 'स्मार्ट स्कूल'चे भवितव्य सध्यातरी अधांतरीच असल्याचे चित्र आहे.

खासगी शाळांच्या स्पर्धेत महापालिकेच्या शाळांमध्येही दर्जेदार शिक्षण मिळावे याकरिता स्मार्ट सिटीच्या मदतीने महापालिकेच्या १०० पैकी ६९ शाळा स्मार्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत ६५६ वर्ग डिजिटल केले जाणार आहेत. ज्यात डिजिटल बोर्ड, डिजिटल कंटेंट, व्हिडिओ, इमेजेस, ग्राफिक्स, अ‍ॅनिमेशन या सर्वांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येणार आहे. या शाळांमध्ये डिजिटल लॅबदेखील उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये आयटी आणि 'आयटीसी'बाबतचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाईल. लॅबमध्ये कॉम्प्युटर्स, तसेच इंटरनेट सुविधाही दिली जाणार आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा याबाबत शिक्षकांनादेखील प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

मात्र, हे सर्व काही अद्यापपर्यंत कागदावरच असल्याने ते पूर्णत्वास येईल की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कारण महापालिकेतील ७० पेक्षा अधिक शाळांची अवस्था खूपच दयनीय असून, पावसाळ्याअगोदर त्याची डागडुजी अपेक्षित होती. या डागडुजीबाबत शिक्षण विभागाने बांधकाम विभागाला वारंवार स्मरणपत्रही दिले होते. परंतु कामे झाली नसल्याने, विद्यार्थ्यांना गळक्या अन् धोकादायक शाळांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवावे लागत आहेत. दरम्यान, शाळा सुरू झाल्यानंतर स्मार्ट स्कूलचे कामे करणार असल्याचे मनपाकडून सांगितले जात असले तरी, मनपाची ही कृती वरातीमागून घोडे असल्याची चर्चा यानिमित्त रंगत आहे.

जुलैपर्यंत १२ शाळा स्मार्ट

काठे गल्ली येथील मनपा शाळा क्रमांक ४३ मध्ये स्मार्ट स्कूलची पायलट क्लासरूम कार्यरत केल्यानंतर आता पहिल्या टप्प्यात महापालिकेने जुलैअखेरपर्यंत नाशिकरोड विभागातील १२ शाळा स्मार्ट करण्याचे ध्येय ठेवले आहे. परंतु डागडुजीची कामे प्रलंबित असल्याने, महापालिकेचे हे ध्येय पूर्ण होईल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

६९ स्मार्ट स्कूलचा प्रस्ताव टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यात येणार आहे. जुलैअखेरपर्यंत नाशिकरोड विभागातील १२ शाळा स्मार्ट होतील अशी अपेक्षा आहे. पायलट क्लासरूम अत्यंत उत्कृष्टपणे उभारण्यात आली असून, इतर शाळांची कामेही लवकरच मार्गी लावली जातील.

– प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त, मनपा

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT