नाशिक : पुढारी वृत्तसेवा; बँकेत अगोदर धनादेश टाकला असता, खाते बंद असल्याच्या कारणास्तव बँकेकडून न वटता परत पाठवण्यात आला. दुसऱ्यांदा त्याच बँकेत धनादेश वटण्यासाठी टाकला असता, 'ड्रॉवर्स सिग्नेचर डिफर्स' या कारणास्तव बँकेने परत पाठवला. अखेर पैसे परत मिळवण्यासाठी फिर्यादीने न्यायालयात दाद मागितली असता, या प्रकरणातील आरोपी नाना कोठावदे यास न्यायालयाने सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबतची माहिती अशी की, 'शेखर रघुनाथ दशपुते व नाना धोंडू कोठावदे यांचे चांगले हितसंबंध आहेत. नाना कोठावदे (रा. सप्तश्रृंगी मंदीरासमोर, सातपूर कॉलनी) यास आर्थिक अडचण असल्याने शेखर दशपुते (रा. विनयनगर, नाशिक) यांनी हातउसनवार म्हणून २०१५ मध्ये ४ लाख ५० हजार रुपये रोख दिले होते. मुदतीनंतर शेखर दशपुते यांनी नाना कोठावदे याच्याकडे पैशांची मागणी केली असता, त्याने सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सातपूर शाखेचा धनादेश दिला. हा धनादेश शेखर यांनी बँकेत वटवण्यासाठी भरला असता, खाते बंद या कारणास्तव धनादेश वटला नाही. त्यामुळे दशपुते यांनी पुन्हा धनादेश बँकेत भरला असता ड्रॉवर्स सिग्नेचर डिफर्स या कारणास्तव न वटता परत आला.
पुढे दशपुते यांनी १६ सप्टेंबर २०१५ रोजी वकिलांमार्फत धनादेश रक्कम मागणीची नोटीस पाठवली. दरम्यान, आरोपी कोठावदे यास नोटीस मिळून देखील धनादेशाची रक्कम दिली नाही. त्यामुळे दशपुते यांनी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात फिर्याद दाखल केली. न्यायालयाने सर्व बाबींचा तपशील लक्षात घेऊन नाना कोठावदेला १३८ अन्वये दोषी ठरवत सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच आरोपीस ४ लाख ५० हजार रुपये एका महिन्याच्या आत द्यावेत व या प्रकरणाचा अतिरिक्त पाच हजार रुपये खर्च द्यावा, रक्कम भरण्यास कसूर केल्यास एक महिना आणखी कैद भोगावी असे आदेश दिले.