उत्तर महाराष्ट्र

नाशिक : अकरावीची विशेष फेरी आजपासून, १२ हजार २८८ प्रवेश निश्चित

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

इयत्ता अकरावीच्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेंतर्गत पहिल्या तीन नियमित फेऱ्या पार पडल्या असून, आतापर्यंत १२ हजार २८८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहे, तर १४ हजार ९५२ जागा अद्यापही रिक्त आहेत. या रिक्त जागा विशेष फेरीतून भरण्यासाठी शिक्षण संचालनालयाने सोमवार (दि. १७) पासून नियोजन केले आहे. त्यानुसार गुरुवार (दि. २०) पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार असून, सोमवारी (दि. २४) गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीसाठी ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. कला, वाणिज्य, विज्ञान आदी सर्व शाखा मिळून २७ हजार २४० जागा उपलब्ध आहेत. पहिल्या गुणवत्ता यादीतील ८ हजार १४१ विद्यार्थ्यांनी, दुसऱ्या गुणवत्ता यादीतील २ हजार ६८४ विद्यार्थ्यांनी प्रवेशावर शिक्कामोर्तब केले आहे. तर तिसऱ्या यादीत अलॉटमेंट मिळालेल्या ३ हजार ७८१ विद्यार्थ्यांपैकी अवघ्या १ हजार ४९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले.

दरम्यान, विशेष फेरीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यास विद्यार्थ्यांना दि. २७ जुलैपर्यंत प्रवेश घेणे बंधनकारक आहे. प्रवेश नाकारल्यास त्यांना यापुढे प्रवेशाची संधी दिली जाणार नाही तसेच विद्यार्थ्यांना यापुढील कोणत्याही फेरीत प्रवेशाची संधी मिळणार नाही. याच कालावधीत कोट्यातील प्रवेशही सुरू राहणार असल्याचे शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहेत.

असे आहे वेळापत्रक

१७ ते २० जुलै : प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे

२१ ते २३ जुलै : पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करणे

२४ जुलै : गुणवत्ता यादी जाहीर (सकाळी १० वाजता)

२४ ते २७ जुलै : प्रवेश घेणे, नाकारणे.

फेरीनिहाय निश्चित प्रवेश

पहिली – ८ हजार १४१

दुसरी – २ हजार ६८४

तिसरी – १ हजार ४९२

एकूण – १२ हजार २८८

SCROLL FOR NEXT