उत्तर महाराष्ट्र

नाशिक : मद्यधुंद पोलिसाकडून पत्नीसह सासू-सासर्‍यावर चाकूने वार

गणेश सोनवणे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
मद्यधुंद पोलिसाने साथीदारासह माहेरी आलेल्या पत्नीसह सासू व सासरे यांच्यावर चाकूने सपासप वार करत रक्ताच्या थारोळ्यात सोडून पळ काढल्याची घटना तालुक्यातील दोडी परिसरात घडली.

दोडी बु. येथील निवृत्ती मुरलीधर सांगळे यांची मुलगी पूजा हिचे सूरज उगलमुगले या पोलिस कर्मचार्‍यासोबत लॉकडाऊनमध्ये लग्न झाले होते. त्यांना सात महिन्यांचा मुलगा असून, दोघेही नाशिकला राहतात. सूरज मनमाड येथे कार्यरत आहे. शुक्रवारी ( दि. 8) रात्री 11 च्या सुमारास सूरज आपल्या जोडीदारासोबत दोडी बु. येथे सासुरवाडीला आल व पत्नीशी तू काल नाशिकला का आली नाही म्हणून कुरापत काढू लागला. थोड्याच वेळात भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले. सूरजने कसलाही विचार न करता पत्नी पूजावर चाकूने सपासप वार करण्यास सुरुवात केली. तर सूरजची सासू शीला व सासरे सोडविण्यासाठी गेले असता त्यांच्यावरही सूरजने वार केले.

आरडाओरडा सुरू झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी सांगळे यांच्या घराकडे धाव घेतली. जमाव घराकडे येत असल्याचे लक्षात येताच सूरज व त्याच्या जोडीदाराने घटनास्थळावरून धूम ठोकली. स्थानिकांनी तातडीने जखमींना दोडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वावी पोलिस ठाण्यात सूरज उगलमुगले व साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर कोते करीत आहेत.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT