उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ‘डीआरडीओ’च्या क्षेत्रात ड्रोनची घुसखोरी, नववा मैल येथील घटना

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील नववा मैल येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) चौकी नंबर दोनच्या कुंपनाजवळ प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी ड्रोन उडत असल्याचे उघडकीस आले आहे. याआधी देवळाली कॅम्प येथील कॅट्सच्या प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडवल्याने खळबळ उडाली असताना आता डीआरडीओच्या कार्यक्षेत्रात ड्रोन आल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेची रेकी करण्यासाठी ड्रोनचा वापर झाला का, इतर कारणांसाठी ड्रोन उडवले याचा पोलिस तपास करीत आहेत.

आडगाव पोलिसांच्या हद्दीत माळोदे वस्तीलगत 'डीआरडीओ'चे कार्यालय आहे. तिथे गट क्रमांक 1203 जवळ शुक्रवारी (दि.23) सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक ड्रोन फिरताना दिसले. 'डीआरडीओ'च्या वसतिगृहातील कर्मचारी अमोल मोरे यांनी त्वरित ही माहिती वरिष्ठांना दिली. लष्करी यंत्रणेने या प्रकरणी अतिशय गंभीर दखल घेत तपास सुरू केला. अज्ञात व्यक्तीविरोधात आडगाव पोलिसात सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती आणि विमान अधिनियम 1934 चा कलम 11 नुसार विनापरवानगी लष्करी भागात ड्रोन उडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवादी विरोधी विभागासह राज्याच्या एटीएस पथकालाही या संदर्भात कळवण्यात आले आहे. त्यानुसार सर्व यंत्रणा ड्रोनचालकाचा माग काढत आहे.

शहरात 16 ठिकाणी नो ड्रोन फ्लाय झोन
जगभरात ड्रोनचा वापर करून घातपाती कृत्ये केली जात असल्याने भारतात ड्रोन वापरावर मर्यादा आल्या आहेत. त्याचप्रमाणे नाशिकमध्येही ड्रोन वापरण्यास नियमावली तयार केली असून, शहरातील 16 ठिकाणी नो ड्रोन फ्लाय झोन जाहीर केले आहेत.

गतमहिन्यातही ड्रोनच्या घिरट्या
ऑगस्ट महिन्यात कॅट्सच्या प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडत असल्याने खळबळ उडाली होती. देशभरात दहशतवाद विरोधी पथकासह राष्ट्रीय तपास यंत्रणा घातपातांच्या कारवाया उघड करीत दहशतवाद्यांची धरपकड करीत आहेत. मालेगावमध्येही धरपकड झालेली असताना नाशिक शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात पुन्हा एकदा ड्रोनची घुसखोरी झाल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे. या घटनेमुळे लष्कर, पोलिस, एटीएस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT