उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime : सहलीला गेले अन् तलवारी घेऊन आले ; गुन्हे शाखेकडून तिघांना अटक

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सहलीसाठी गेलेल्या दोघा मित्रांनी उज्जैनमधून सात तलवारी खरेदी करून नाशिकला आणल्या. स्वत:सह मित्रांच्या घरी या तलवारी लपवल्या होत्या. मात्र, गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास करून मित्रांकडून सातही तलवारी जप्त केल्या आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विपुल अनिल मोरे (28), चेतन रमेश गंगवाणी (26) आणि गणेश राजेंद्र वाकलकर (22, तिघे रा. शितळादेवी चौक) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी शहरात मनाई आदेश लागू केले असून, त्यामुळे गुन्हे शाखांसह पोलिस ठाणेनिहाय प्रतिबंधात्मक कारवाई सुरू आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे अंमलदार विशाल देवरे यांना संशयित तरुणांकडे तलवारी असल्याचे समजले. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना माहिती दिल्यानंतर अंमलदार रवींद्र बागूल, प्रदीप म्हसदे, आसिफ तांबोळी, प्रवीण वाघमारे यांच्या पथकाने जुने नाशिक भागातील काझीगढी येथे संशयितांचा शोध घेतला. यावेळी संशयित विपुलच्या घरातून चार, गणेशच्या घरातून दोन आणि चेतनच्या घरातून एक तलवार जप्त करण्यात आली.

गणेश आणि चेतन हे सहलीसाठी गेले असताना त्यांनी सात हजारांत सात तलवारी खरेदी केल्याचे पोलिस तपासात समोर आले. वाढदिवसाचे केक कापण्यासाठी किंवा शस्त्र असावे या हेतूने या तलवारी खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. या शस्त्रांचा वापर घातक कृत्यांसाठी होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी तिघांविरुद्ध कारवाई केली आहे.

बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणे किंवा वापरणार्‍यांविरुद्ध कारवाई सुरू आहे. ज्यांच्याकडे शस्त्र असतील त्यांनी स्वत:हून जवळच्या पोलिस ठाण्यात जमा करावीत. धारदार शस्त्रांनी केक कापू नये किंवा इतर कार्यक्रमातही शस्त्र वापरू नये. असे केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT