उत्तर महाराष्ट्र

नाशिक : बोअरवेलही आटले, जलवाहिनीअभावी रहिवासी तहानलेले

अंजली राऊत

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
पाथर्डी गाव व पाथर्डी फाटा परिसरात नागरी वस्ती झपाट्याने वाढत आहे. परंतु महापालिकेकडून पुरेशा सुविधा दिल्या जात नाहीत. पाथर्डी भागातील धोंगडे पाटीलनगरातील जवळपास सर्वच बोअरवेल आटल्याने येथील सुमारे 200 रहिवाशांना जलवाहिनीअभावी दररोज टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे. जलवाहिनीअभावी रहिवासी तहानलेले, अशी स्थिती या भागाची झाली असून, नागरिकांवर स्थलांतराची वेळ आली आहे.

पाथर्डी भागातील धोंगडे पाटीलनगरात मोठ्या प्रमाणात वसाहती उभारल्या जात आहेत. पाथर्डी शिवारातील हॉटेल एक्स्प्रेस इन यांच्या मागील बाजूस नंबर 224 मध्ये विजय लक्ष्मी रो-हाउसची स्किम बांधण्यात आली होती. या ठिकाणी तब्बल ३९ रो-हाउस असून, २०० हून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. परंतु येथे सर्वात महत्त्वाची मूलभूत सुविधा म्हणजे पाण्याची जलवाहिनी महापालिकेकडून टाकण्यात आलेली नाही. नागरिकांना पाण्यासाठी बिल्डरकडून ४० रो-हाउससाठी ५ ते ६ बोअरवेल देण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या चार महिन्यांपासून बोअरवेलचा पाणीसाठा आटला आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणीदेखील मिळत नाही. या वसाहतीतील नागरिकांना गेल्या चार महिन्यांपासून टँकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शुद्ध पाण्याअभावी रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. मनपा पाणीपुरवठा विभागाकडे अनेकदा तक्रार करूनही जलवाहिनीच्या उभारणीकडे दुर्लक्ष केले जात आहे, त्यामुळे नागरिकांना अक्षरशः स्वतःचे घर सोडून जाण्याची वेळ आली आहे. काही रहिवाशांनी, तातडीने जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करावे अन्यथा मोठे आंदोलन उभारू, असा इशारा दिला आहे.

पाथर्डी गाव, पाथर्डी फाटा परिसरात नागरी वस्ती झपाट्याने वाढत आहे. धोंगडे पाटीलनगरसह परिसरात महापालिकेने पाण्यासाठी टँकरसेवा सुरू केली पाहिजे. -संजय नवले, माजी नगरसेवक.

पाथर्डी गाव व परिसरातील कॉलनी भागात मनपाने रस्ते, पाणी, ड्रेनेज तसेच पथदीपांची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. – त्र्यंबक कोंबडे, सामाजिक कार्यकर्ता.

पाथर्डी गावालगत मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढत आहे. मनपाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे. मनपाने नागरिकांना पाणी, घंटागाडीसह नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. -धनंजय गवळी, सामाजिक कार्यकर्ता.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT