उत्तर महाराष्ट्र

नाशिक : ग्रामपंचायतींसाठी बुधवारपासून अर्जप्रक्रिया

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील ८८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची अधिसूचना तहसीलदारांनी प्रसिद्ध केली. या सर्व ठिकाणी येत्या बुधवार (दि. २४) पासून इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरता येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी २०२१ ते मे २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या आणि जून ते सप्टेंबर या काळात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील नाशिक, दिंडोरी व कळवण तालुक्यांतील ८८ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या तिन्ही तालुक्यांच्या तहसीलदारांनी निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी (दि. १९) जाहीर केली. इच्छुकांना आता बुधवार (दि. २४) पासून अर्ज दाखल करता येणार आहे. उमेदवारांना १ सप्टेंबरपर्यंत दुपारी 3 पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. २ तारखेला छाननी तसेच ६ सप्टेंबरला दुपारी 3 पर्यंत माघारीसाठी वेळ असणार आहे. तसेच १८ सप्टेंबरला मतदान व दुसऱ्या दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे. दरम्यान, निवडणुकींची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याने इच्छुक आता कामाला लागले आहेत. गावपातळीवर पॅनल उभारणीसह प्रभागनिहाय उमेदवार निश्चितीसाठीही बैठकांचा फड जमत असल्याने निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले आहेत.

ग्रामपंचायतींची संख्या अशी: नाशिक १६, दिंडोरी ५०, कळवण २२.

कळवण : तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठीची मतमोजणी १९ सप्टेंबरला कोल्हापूर फाटा येथील प्रशासकीय इमारतीत होणार आहे. कळवण तालुक्यात २२ ग्रामपंचायती जिल्हा परिषदेच्या चारही गटांतील आहेत. या निवडणूक जरी पक्षीय चिन्हविरहित असल्या, तरी आपल्या समर्थकांची वर्णी लागावी, यासाठी सर्वच लोकप्रतिनिधी अप्रत्यक्ष प्रयत्न करतील. त्यामुळे या निवडणुकांचे निकाल आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर परिणाम करणारे नक्कीच असतील. त्यामुळे या निवडणुकांची रंगत वाढणार आहे.

निवडणूक जाहीर झालेल्या ग्रामपंचायती : वडाळे वणी, आठंबे, नवी बेज, पाटविहीर, नाकोडे, गणोरे, धार्डेदिगर, दह्यानेदिगर, भेंडी, दरेभणगी, मोकभणगी, भुताणेदिगर, ककाणे, जुनी बेज, खेडगाव, विसापूर, रवळजी, पिंपळे बु., नाळीद, मळगाव खु., गोबापूर, साकोरे आदी.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT