उत्तर महाराष्ट्र

Nashik : सातपूरमध्ये हुक्का पार्लरवर कारवाई

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गुन्हे शाखा युनिट दोन व मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सातपूरमधील पिंपळगाव ढगा शिवारातील डेझर्ट शिप व बजरंगनगरमधील अण्णाचा मळा या हॉटेलमध्ये कारवाई करीत तेथील हुक्का पार्लरचा अड्डा उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ व डॉ. अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. हॉटेल डेझर्ट शिप येथे केलेल्या कारवाईप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात हॉटेल मालक अभिषेक सुब्रमण्या मंजिताया (रा. मातृछाया अपार्टमेंट, भाभानगर, मुंबई नाका) याच्यासह हुक्क्याचे सेवन करणाऱ्या ग्राहकांविरोधात कोटपा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये ६२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. तसेच मध्यवर्ती गुन्हे शाखेने सातपूर हद्दीतीलच बजरंगनगरमधील हॉटेल अण्णाचा मळा याठिकाणी छापा टाकून कोटपान्वये कारवाई केली.

डॉ. मुदगल यांना हॉटेल अण्णाचा मळा याठिकाणी हुक्का पार्लर सुरु असल्याची खबर मिळाली होती. मध्यरात्री पथकाने छापा टाकला असता, त्याठिकाणी हुक्क्यांमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केले जात असल्याचे आढळून आले. याप्रकरणी हॉटेल मालक जितेश बरवीर पाठक (३०) व्यवस्थापक गोविंद भगवान अवचार (१९, रा. दोघे राधाकृष्णनगर, सातपूर) या दोघांसह ग्राहकांविरोधात कोटपान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याठिकाणी हुक्का पॉटसह प्रतिबंधित सुगंधित तंबाखुजन्य पदार्थ व साहित्य असा ६ हजार ५९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसात कोटपाअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT