नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; शहरात ठिकठिकाणी सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर शहर पोलिसांनी कारवाई करीत सुमारे ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शहरातील १४ ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट १ व २ च्या पथकाने ही कारवाई केली.
शहरात अनेक हॉटेलमध्ये हुक्का पार्लर सुरू असून, तेथे तरुणाई हुक्क्याच्या आहारी गेल्याचे दिसते. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेस या हुक्का पार्लरवर कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकांनी गंगापूरच्या हद्दीतील हॉटेल कोबल स्ट्रीट, हॉटेल बारको, कॉलेजरोडवरील हॉटेल एअर बार येथे कारवाई केली. तर मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डेटामॅटिक्स इमारतीच्या तळमजल्यावरील गाळ्यात, भद्रकालीच्या हद्दीत गाडगे महाराज पुलाजवळील हॉटेल शांतीइन, इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गौळाणे रोडवरील हॉटेल तात्याबा ढाबा येथे कारवाई करीत तेथून १४ संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हुक्क्यासाठी लागणारे ६४ हजार ३९० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. संशयितांविरोधात पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल, विजय ढमाळ, आनंदा वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
स्थानिक पोलिसांचे दुर्लक्ष
गुन्हे शाखेच्या तीनही पथकांनी ही कारवाई केल्याने स्थानिक पोलिसांच्या दुर्लक्षाकडे हुक्क्याच्या धुरातील 'अर्थ' समोर येत आहे. कारवाई केलेले हॉटेल रस्त्यालगत व वर्दळीच्या ठिकाणी असतानाही स्थानिक पोलिसांच्या गस्तीत हुक्का पार्लर का नाही दिसले किंवा दिसले तरी कारवाई का नाही झाली याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.