नंदुरबार - स्वातंत्र्य सेनानी साने गुरुजी यांच्या विचारांचे सच्चे पाईक, राष्ट्रसेवा दलाचे निष्ठावंत सेवक आणि समाजवादी विचारांचे खरे प्रचारक अशी ओळख लाभलेले नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर पितांबर सरोदे यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार, दिनांक 14 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी निधन झाले.
नंदुरबार जिल्हा अस्तित्वात येण्याच्या आधीपासून डॉक्टर पितांबर सरोदे यांनी साहित्यिक आणि वैचारिक कार्यात वाहून घेतले होते. स्वातंत्र्य सैनिक साने गुरुजी यांच्या प्रत्यक्ष कार्यातून प्रेरणा घेऊन अखेरच्या श्वासापर्यंत ते कार्यरत राहिले. साहित्य क्षेत्रातील त्यांची सेवा आणि कार्य मोठे उल्लेखनीय राहिले. स्वर्गीय स्वातंत्र्य सेनानी यदुनाथ थत्ते यांच्या समवेत साधना मासिकाच्या माध्यमातून तत्सम मान्यवरांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक जाणून आहेत़.
नंदुरबार सारख्या दुर्गम भागात राहून महात्मा गांधी व साने गुरुजी यांच्या विचारांना वाहिलेली ग्रंथसंपदा निर्माण करणे आणि वितरण करणे यात त्यांचा मोलाचा सहभाग होता. अनुवादित आणि स्वलिखित अशा 50 हून अधिक प्रमुख ग्रंथ लेखन प्रकाशित केलेले असून वाचन चळवळ व गाव तिथे वाचनालय स्थापनेच्या चळवळीला देखील चालना देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. लोकमान्य टिळक वाचनालयाचे सचिव ,शहीद स्मृतीचे कार्याध्यक्ष, व बऱ्याच सामाजिक संस्थेचे सलग्न असे कार्यरत असे हे मनमिळाऊ, ज्येष्ठ साहित्यिक आज सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी अल्पशा आजाराने आपल्यातून निघून गेले. राजकीय सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांमध्ये त्यांचा आदर युक्त दबदबा होता. या सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत आज शुक्रवार (दि.14) रोजी सायंकाळी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.