नंदुरबार - भरधाव वेगातील पिकअप वाहन रस्त्याखाली उतरुन उलटले आणि एका किराणा दुकानात घुसले. या अपघातामुळे मात्र त्या व्हॅनमधून केला जाणारा सुमारे १३ लाख ८२ हजाराचा मद्यसाठा आणि अवैध पिस्तूल पोलिसांच्या हाती लागले. याप्रकरणी चार जणांविरुद्ध मोलगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याविषयी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अक्कलकुवा तालुक्यातील काठी ते धडगाव रस्त्याने पिकअप गाडी (क्र. एमएच २५ पी १४५४) भरधाव वेगात जात होती. सदर वाहन वेगात असतांना काठी गावाजवळ रस्त्याच्या खाली उतरुन उलटले. या अपघातग्रस्त वाहनातून दारुसाठा वाहतुक होत असल्याचे आढळून आले असून काही हत्यारेही मिळून आली आहेत. या पिकअप वाहनातून स्टीलची तलवार, २ हजार रुपये किंमतीचा कमांडर टार्गट एअर पिस्टर आणि १३ लाख ८२ हजार ४०० रुपये किंमतीचा दारूसाठा मिळून आला आहे. अपघातग्रस्त वाहन उलटून रस्त्यालगत असलेल्या काठी येथील बिज्या आरसी वळवी यांच्या किराणा दुकानावर धडकल्याने दुकानासह साहित्याचे नुकसान झाले आहे.
अपघात घडताच वाहनातील तीन जण पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच मोलगी पोलिसांनी अपघातस्थळी जावून पंचनामा करीत दारुसाठा, हत्यार व पाच लाखाचे पिकअप वाहन असे एकुण १८ लाख ८५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत बिज्या आरसी वळवी यांनी मोलगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमेद गोविंदसिंग पाडवी (रा काठी पाटपाडा, ता. अक्कलकुवा), नागेश दमण्या वळवी (रा. कात्री, ता.धडगाव), एक अनोळखी इसम व वाहन मालक बटेसिंग रमण्या पावरा (रा. बोरी ता धडगाव) या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत.