नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात सर्वत्र घरफोडी, मोटरसायकल चोरी आणि लहान मोठ्या चोरीच्या घटनांनी सध्या उच्छाद मांडलेला आहे. अशातच नवापूर बस स्थानकावर प्रत्यक्ष महिला पोलिसाच्या पर्स मधून दागिने लंपास करण्याचा प्रताप घडवून चोरांनी जणू पोलीस दलालाच धक्का दिला. ज्यांच्या पर्समधून दागिने चोरी झाली, त्या पोलीस हेडकॉन्स्टेबल ठाणे येथील रहिवासी आहेत.
या विषयी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, या प्रकरणी श्रीमती ललिता नाईक (वय ४९ वर्ष) व्यवसाय नोकरी (पोलीस हेडकॉस्टेबल संरक्षण व सुरक्षा पी-२ मुंबई) यांनी नवापूर पोलीस ठाण्यात दिनांक 17 जानेवारी 2025 रोजी फिर्याद दिली. दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नाशिक-नवापूर एसटी बसमधून प्रवास करत असताना ही घटना घडल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
२० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी. अंदाजे ०४ ग्रॅम वजन, १८ हजार रु. किं. चे ५ ग्रॅम वजनाचे दोन जोड सोन्याचे टोंगल, २ हजार रु. किं. चे चांदीचे पायातील साकळ; असे एकूण ४० हजार रु.किं. चे सोने चांदीचे दागिने त्यांच्याकडील सिल्वर कलरच्या कलरच्या पर्स मधून कोणा अज्ञात चोराने चोरून नेले; असेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक केशव गावीत करीत आहेत.