नंदुरबार

नंदुरबारमध्ये अवैध मद्य साठा पकडणाऱ्या मुंबईतील पथकावर दगडफेक

backup backup

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरात आज (दि. ७) उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबईतील भरारी पथकाने छापेमारी केली. या कारवाई दरम्यान पथकावर अचानक दगडफेक केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामध्ये दगडफेक केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 20 लाख 44 हजाराचा मद्य साठा आणि वाहन जप्त करण्यात आले आहे.

या संदर्भात सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार डाव गावाच्या हद्दीत परराज्यातील अवैध मद्य साठा असल्याची गुप्त माहिती मुंबईतील भरारी पथकाला प्राप्त झाली होती त्यानुसार विजयकुमार सुर्यवंशी, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार सुनिल चव्हाण, सह-आयुक्त (प्रशासन), राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई च्या राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने बुधवारी (दि. ६) अक्कलकुवा-मोलगी रस्त्यावर डाब गावाच्या हद्दीत आश्रम शाळेजवळ पाळत ठेवून छापा टाकला. सदर जागेतून गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचे १८० बॉक्स व अशोक लेलैंड कंपनीचा चारचाकी टेम्पो (क्र. MH-39-AD-1639) हे वाहन असा एकूण रु. २०,४४,४००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन वाहन चालक टिकाराम लक्ष्मण पावरा व त्याचा साथीदार (क्लीनर) जितेंद्र धनराज महाले यांना महाराष्ट्र दारुबंदी कायदा अन्वये अटक केली व गुन्ह्याची नोंद केली.

या कारवाई दरम्यान अमलीबारी जवळील घाट रस्त्यात या कारवाई करणाऱ्या पथकावर अचानक काही जणांनी दगडफेक केल्याची घटना घडली. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाचे जवान शाहरुख तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दगडफेक करुन व सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या अनिल आपसिंग वसावे व वसंत शिफा वसावे यांना अक्कलकुवा, पोलीस ठाणे, जि. नंदुरबार यांनी ताब्यात घेतले व त्यांच्या विरुध्द गुन्हा नोंद केला. सदरच्या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक, एस. एन इंगळे, तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्री. रविंद्र पाटील, जवान सर्वश्री शाहरुख तडवी, सोमनाथ पाटील, नंद महाजन यांनी भाग घेतला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री. आर. एम. खान व श्री. व्ही. के. थोरात, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक श्री. एस. एन. इंगळे हे करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT