Sarangkheda Horse Festival
नंदुरबार: सुमारे चारशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेली आणि पिढ्यान्पिढ्या आपला सांस्कृतिक ठेवा जपून ठेवणारी सारंगखेडा यात्रोत्सवानिमित्त होणाऱ्या घोडे महोत्सवात यंदा एका खास पाहुणीने हजेरी लावली आहे. 'रुद्रानी' असे या देखण्या घोडीचे नाव असून किंमत तब्बल १ कोटी १७ लाख रुपये आहे.
देशातील सर्वात मोठ्या घोडे बाजारांपैकी एक असलेल्या सारंगखेडा येथे विविध राज्यांतून उत्तम जातीचे घोडे दाखल झाले आहेत. मात्र, 'रुद्रानी'ची बांधणी आणि तिचे विशेष वैशिष्ट्य यामुळे ती चर्चेत आहे.
या खास घोडीचे वय फक्त २२ महिने आहे, पण तिने नुकतीच ६५ इंचांची उंची गाठली आहे. तिची बांधणी, चाल आणि शरीरयष्टी खूप आकर्षक आहे. यामुळे घोडा बाजारातील तज्ज्ञ आणि शौकीनही प्रभावित झाले आहेत.
रुद्रानीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी तिची विशेष काळजी घेतली जाते. तिच्या खुराकात विशेष लक्ष दिले जाते. तिला दररोज किमान आठ लिटर गाईचे शुद्ध दूध प्यावे लागते. या विशेष आहारामुळेच तिची तंदुरुस्ती आणि चमक महोत्सवात उपस्थित असलेल्या लोकांसाठी कुतूहलाचा विषय बनली आहे.
रुद्राणीचे मालक मध्य प्रदेशातील महेश्वर येथील यादव इस्टेट फार्मचे राजेंद्र यादव आहेत. त्यांनी तिला यावर्षी सारंगखेडा यात्रेत प्रदर्शनासाठी आणले होते. कोट्यवधी रुपयांची किंमत असलेल्या या 'रुद्रानी'ला पाहण्यासाठी बाजारात मोठी गर्दी उसळत आहे. घोडेप्रेमी तिच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी धडपडत आहेत. यामुळे, यंदाच्या सारंगखेडा महोत्सवाचे मुख्य आकर्षण 'रुद्रानी' ही घोडी ठरली आहे.