नंदूरबार : पुढारी ऑनलाइन डेस्क - नंदूरबार येथे शनिवार (दि.14) पासून सारंगखेडा यात्रेची तयारी पूर्ण झाली असून यात्रेत आतापर्यंत तब्बल 1800 घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. एकदिवस आधीपासूनच घोडेबाजार सुरु झाला आहे. पहिल्या दिवशीच या घोडेबाजारात 13 घोड्यांची विक्री झाली असून 5,26,000 रुपयांची उलाढाल झाली आहे. प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी यांनी यात्रेतील तयारीचा आढावा घेतला आहे. विक्रीसाठी एकूण 3,000 घोडे दाखल होतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी यांच्याकडून यात्रेच्या तयारीची पाहणी करण्यात आली असून आतापर्यंत 1500 वर घोडे दाखल झालेले आहेत. आणखी घोडे शनिवार (दि.14) पर्यंत दाखल होतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या सारंगखेडा येथील घोडेबाजाराला अनेक ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. जातिवंत घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी सारंगखेड्याचा घोडेबाजार प्रसिद्ध आहे. त्यामुळे संपूर्ण भारतभरातील घोड्यांचे शौकीन दूरदूरवरुन या ठिकाणी घोडे खरेदीसाठी येतात.
सारंगखेडा येथील घोडेबाजार मारवाड, सिंध, पंचकल्याणी, नुकरा, पंजाबी, अबलख, काठीयावाड जातीच्या एकाहून एक सरस आणि देखणे असे दर्जेदार घोडे या ठिकाणी खरेदी विक्रीसाठी येत असतात.
बाजार समितीत झालेल्या नोंदणीनुसार येथे दरवर्षी विक्रमी उत्पन्नाची उलाढाल होत असल्याची नोंद आहे. घोडेबाजार मधील उलाढालीचा नेमका अंदाज येत नाही, मात्र बाजार समितीत नोंद असलेल्या व्यवहारातून दरवर्षी कोटींची उलाढाल होत असल्याचे सांगण्यात येते.
घोड्यांच्या अंगातील जन्मजात असलेले रूप, स्वभाव, शुभ गुण आणि खुणा यावर घोड्यांच्या किमती असल्या तरी त्याची चाल, रपेट, नाचकाम, रुबाबदारपणा याचीही पाहणी खरेदीदार करून त्याची किंमत ठरावीत असतात. घोड्यांचे नखरे हे त्याच्या सौंदर्याचे प्रतीक असते आणि या बाजारात अशाच अनेक घोड्यांचे नखरे अश्व शौकिनांना आकर्षित करत असतात. घोड्याची ऐटबाज चाल आणि धावण्याची पद्धत याचीही प्रात्यक्षिके खरेदीदारांच्या समोर केली जात असून त्यानंतर घोड्यांची विक्री होत असते.