कोरडा झालेला लाटीपाडा पांझरा प्रकल्प (छाया : अंबादास बेनुस्कर)
नंदुरबार

पिंपळनेर : लाटीपाडा 26 तर जामखेडीमध्ये 35 टक्के जलसाठा

पुढारी वृत्तसेवा

पिंपळनेर,जि.धुळे : धुळे जिल्ह्यासाठी महत्वाचा व साक्री तालुक्यातील शेतीला पाणी पुरवठा करणारा लाटीपाडा पांझरा प्रकल्प गेल्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरला होता तर मागील वर्षी पिंपळनेरमध्ये 367 मि.मी इतक्या पावसाची नोंद झाली होती. या प्रकल्पामुळे पिंपळनेरसह परिसरातील 50 टक्के पेक्षा जास्त क्षेत्र पाण्याखाली आले आहे. पिंपळनेरसह आदिवासी पश्चिम पट्ट्यात दरवर्षी चांगला पाऊस झाल्यास त्यात सुमारे 1533 द.ल.घ.फु इतके पाणी जमा होते. लाटीपाडा धरणामुळे शेतीला पाणी उपलब्ध होत असून, या प्रकल्पामुळे परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होते. पांझरा प्रकल्पातून डावा कालवा आणि उजवा कालवा अशा दोन कालव्याने सर्वत्र पाणीपुरवठा होतो. उजवा कालवा हा 22.80 किमी आहे तर डावा कालवा हा 6.80 किमी.चा आहे. या दोन्ही कालव्याच्या माध्यमातून पांझरा प्रकल्पातून पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र यंदा येथील धरणांमध्ये पाण्याची पातळीत घट झाली असून पात्र कोरडे झालेले पहावयास मिळत आहे.

पांझरा प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता 1533 द.ल.घ.फु असून त्यातील 1258 द.ल.घ.फु उपयुक्त पाण्याचा साठा आहे तर 278 द.ल.घ.फु एवढा मृत जलसाठा आहे. लाटीपाडा धरणात सद्यस्थितीत 335 द.ल.घ.फु म्हणजेच 26 टक्के इतका जलसाठा उपलब्ध आहे. तर जवळच असलेल्या जामखेडी प्रकल्पात 154 द.ल.घ.फु म्हणजेच 35 टक्के पाणी शिल्लक आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नदीकाठावरील गावांना आरक्षित पाणी मागणीनुसार दिले जाते. सद्यस्थितीत काटवान भागासाठी पाणी दिले जात आहे. या 26 टक्के जलसाठ्याचा योग्य प्रकारे वापर केल्यास संपूर्ण जलसाठा उपयुक्त ठरणार आहे. पाण्याचा सुयोग्य व नियोजनबद्ध वापर केला तरच लाटीपाडा धरणातील पाणी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पुरणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अतिशय अल्प प्रमाणात जलसाठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा. कधीही पाण्याची कमतरता पिंपळनेरकरांना भासली नसून दररोज मुबलक प्रमाणात वेळेवर पाणी उपलब्ध होत असल्याने बेजबाबदार नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय केला जातो आहे. काही भागातील नळांना तोट्याच नसल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. तर काही जण उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी अंगणात सकाळ-संध्याकाळ पाण्याचा छिडकावा करतांना आढळून येत आहेत. त्यामुळे भविष्यात जलसंकट निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे.

पूर्ण भरलेल्या धरणाच्या सांडव्याचे आजचे चित्र एरव्ही पूर्ण क्षमतेने भरणाऱ्या लाटीपाडा धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहत असते. परंतु उन्हाळ्यापूर्वीच जलसाठा कमी होत असल्याने संपूर्ण पात्र कोरडे होते. पुन्हा जून महिन्यात पावसाच्या पाण्यात हेच पात्र पूर्णपणे भरून सांडव्यावरून पाणी वाहते. या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने पाणी समस्या तीव्र होणार आहे.

सांडव्याचे पात्र कोरडच

लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यावर राज्यभरातून पर्यटक येथे दाखल होतात. शिवाय निसर्गमय वातावरणाचा आनंद घेतांना दिसून येतात. परंतु जानेवारी महिन्यानंतर याच धरणाच्या सांडव्याच्या पात्रात काहीच पाणी शिल्लक राहत नाही. शिवाय या कालावधीत पर्यटकांची संख्याही नसते. जरी संपूर्ण जलसाठा योग्य नियोजनाने उपयोगात येत असला तरी उन्हाळ्यातील वास्तव स्थिती अनेकांना माहिती नसते व लाटीपाडा धरणाच्या सांडव्यालगतच्या पात्रात मुबलक प्रमाणात पाणी असते व लाटीपाडा धरण नेहमी पूर्ण क्षमतेने वर्षभर भरलेलेच असते असा गैरसमज झालेला असतो. मात्र आजच्या स्थितीत संपूर्ण सांडव्याचे पात्र कोरडेखट्ट झाल्याचे चित्र आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT