नाशिक : देशभरात नीट (NEET) परीक्षेवरून उभ्या राहिलेल्या वादळाला छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या निर्णयाने मोठा धक्का बसला आहे. गुणांमध्ये तफावत झाल्याचा दावा करणाऱ्या चारही याचिका न्यायालयाने फेटाळून लावत प्रत्येक याचिकाकर्त्यावर पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. दिल्लीहून मागवलेल्या मूळ उत्तरपत्रिकांची प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेचा (NTA) निकाल अचूक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
या निर्णयानंतर नीट परीक्षेभोवती उभे राहिलेले आरोप, आंदोलने आणि विविध दावे पुन्हा चर्चेत आले आहेत. न्यायालयाने मूळ उत्तरपत्रिका तपासून याचिकांमधील दाव्यांना आधार नसल्याचे स्पष्ट केल्याने, या संपूर्ण वादातून निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाबाबतही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. देशभरात झालेल्या आंदोलनांमागील दाव्यांचा आधार नेमका काय होता, यावर आता नव्याने चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
याचिकांसोबत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये आणि मूळ उत्तरपत्रिकांमध्ये तफावत आढळल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेऊन फौजदारी कारवाई टाळली असली, तरी दंड ठोठावत न्यायालयाने स्पष्ट संदेश दिला — पुराव्याशिवाय गंभीर आरोप करून न्यायालयाचा वेळ वाया घालवला जाऊ नये.
या निर्णयामुळे नीट वादातील अनेक दाव्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, न्यायालयाच्या निकालानंतर या संपूर्ण प्रकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.