Crime News Pudhari
नंदुरबार

Nandurbar crime | डोक्यात वार करून तरुणाची हत्या, नंदुरबारमध्ये खळबळ

या हत्येमागे आधीच्या खून प्रकरणाचे संदर्भ असल्याची माहिती मिळत आहे

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार : शहरातील एका हॉटेलमध्ये अचानक हल्ला करून तरुणाची हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या जयंत वळवी हत्या प्रकरणाचा यामागे संदर्भ असल्याचे पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

सागर रमेश जाधव (कैकाडी) वय २५ वर्ष रा.रायसिंगपुरा नंदुरबार असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव असून नंदुरबार शहरातील तळोदा रोडवर एका हॉटेलचा व्यवस्थापक म्हणून तो काही वर्षांपासून काम पाहत होता. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुणाल सदाशिव मराठे राहणार श्रीजी कॉलनी नंदुरबार नामक तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार काल शनिवार दिनांक 11 एप्रिल 26 रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान नेहमीप्रमाणे मंदाकिनी हॉटेलच्या काउंटरवर सागर हा दैनंदिन काम पाहत होता. त्यावेळी काही तरुण हॉटेलमध्ये आले आणि काउंटरवर बसलेल्या सागरवर हल्ला केला. त्यामुळे गंभीर जखमी झालेला सागर हॉटेलमधून बाहेर पडला तेव्हा त्याचा मित्र कुणाल मराठे याने त्याला गंभीर जखमी अवस्थेत तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले परंतु उपचार चालू असताना रात्री दोन वाजेच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी कुणालने फिर्यादीत दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलचे मालक हे जय वळवीच्या खुनाच्या गुन्हयामध्ये जेलमध्ये असताना हॉटेल चालू ठेवण्याची हिम्मत का केली. तुझा हॉटेल चालु ठेवण्याचा काय संबंध या कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने कैलास पाडवी याने लाकडी दांडयाने सागर जाधव याचे पोटात, हातावर व डोक्यावर मारहाण केली तर विक्की राजपुत याने स्कॅनर मशिन डोक्यावर मारुन गंभीर दुखापत केली तसेच सर्वानी हाताबुक्क्यांनी मारहाण करुन वाईट वाईट शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली; असे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात संशयित म्हणून विक्की राजपुत (रा. परदेशीपुरा, नंदुरबार) कैलास पाडवी (रा.वाघोदा, नंदुरबार), दिपक ठाकरे (रा. नंदुरबार), निलेश ऊर्फ बंटी वसंत चौधरी (रा. चौधरी गल्ली, नंदुरबार) आणि त्यांचे सोबत असलेला एक अनोळखी मुलगा यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हे पाचही संशयित अद्याप फरार आहेत, अधिक तपास पोलिस संदिप पाटील हे करत आहेत.

दरम्यान नंदुरबार शहरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. काही महिन्यांपूर्वी आदिवासी संघटनेत कार्यरत असलेल्या जयंत वळवी याचा सिंधी कॉलनी परिसरात चाकूने भोसकून हत्या झाली होती आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण झाला होता. कलेक्टर ऑफिसवर मोर्चा नेऊन जाळपोळ करण्याचा प्रकार देखील घडला होता. त्याप्रकरणी भैय्या मराठे व अन्य जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. आजची हत्या ज्या हॉटेलमध्ये झाली त्याचे मालक हेच मराठे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आजच्या हत्या प्रकरणात हल्लेखोरांनी जयंत वळवी हत्येचा संदर्भ दिल्याचे म्हटले जात असल्यामुळे पोलीस यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. हॉटेल परिसर आणि शहरातील रायसिंगपूर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT