नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा, नवापूर आणि नंदुरबार नगरपरिषदांच्या निवडणुकांचे मतदान रविवारी (दि.30) उत्साहात पार पडले. चारही नगरपरिषद क्षेत्रांतील 2 लाख 25 हजार 038 मतदारांपैकी 1 लाख 50 हजारांहून अधिक मतदारांनी मतदान केले. सर्व ठिकाणी मिळून सुमारे 60 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.
निवडणुकीत मतदारांचा प्रतिसाद जोरदार होता. पक्षांनी प्रचारात मोठी ऊर्जा खर्च केली. सकाळी मतदानाचा वेग मंद होता, दुपारपर्यंत अनेक केंद्रांवर शांत वातावरण दिसत होते. त्यामुळे तीननंतर विविध प्रभागातील कार्यकर्त्यांना मतदारांना बाहेर काढण्यासाठी धावपळ करावी लागली. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून चार ते सहा या वेळेत मतदान केंद्रांवर चांगली गर्दी झाली.
दुपारी चारपर्यंतच्या शासकीय आकडेवारीनुसार:
तळोदा – 53 टक्के
शहादा – 49 टक्के
नंदुरबार – 46 टक्के
नवापूर – 45 टक्के निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर उमेदवारी दाखल झाली होती.
नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी व मा. जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस. यांनी सपत्नीक सकाळी नंदुरबार नगरपरिषद निवडणुकीसाठी मतदान करून लोकशाही प्रक्रियेतील आपला सक्रिय सहभाग नोंदवला. मतदान केंद्रावर उपस्थित राहून त्यांनी शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने आपला मताधिकार बजावला.
नंदुरबार जिल्ह्यातील नगरपरिषद व नगर पंचायतींच्या निवडणुका आज होत असून प्रशासनाच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिला, तरुण मतदार तसेच ज्येष्ठ नागरिक उत्साहाने मतदानासाठी उपस्थित होते.
नंदुरबार नगरपरिषदेच्या 41 जागांसाठी 959 उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार होते. शहादा नगरपरिषदेच्या 29 जागांसाठी 117 उमेदवार, आणि नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार होते. नवापूर नगरपरिषदेच्या 23 जागांसाठी 108 उमेदवार रिंगणात होते. तळोदा नगरपरिषदेच्या 21 जागांसाठी 65 उमेदवारांनी नोंद केली होती. जिल्ह्यातील 256 मतदान केंद्रांवर 92 मतदान पथके काम करत होती. नंदुरबारमध्ये 55 आणि नवापूरमध्ये 11 संवेदनशील केंद्रे होती. एकूण यंत्रणेत 332 कंट्रोल युनिट, 632 बॅलेट युनिट, 303 केंद्राध्याक्ष, 933 मतदान अधिकारी आणि 303 सहायकांचा समावेश होता. मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडले.