दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थिनींच्या स्वप्नांना बळ देणारा प्रेरणादायी उपक्रम नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला Pudhari
नंदुरबार

Nandurbar News | जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच आदिवासी विद्यार्थिनी बनली एक दिवसाची जिल्हाधिकारी!

मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः हात धरून बसवले जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत; आचल वसावेच्या स्वप्नांना मिळाली नवी दिशा

पुढारी वृत्तसेवा

Tribal Girl Student Collector

नंदुरबार : दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थिनींच्या स्वप्नांना बळ देणारा प्रेरणादायी उपक्रम नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा या अतिदुर्गम गावातील इयत्ता अकरावीची विद्यार्थिनी आचल धीरज वसावे हिला जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच एक दिवसासाठी जिल्हाधिकारी होण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः तिचा हात धरून तिला जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमुख खुर्चीत बसवले. आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण अनुभवताना आचलच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

बालदिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘एक दिवसाची जिल्हाधिकारी’ या अभिनव उपक्रमांतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांची प्रमुख उपस्थिती होती.

शुक्रवारी (दि. १३) नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री आदिती तटकरे यांनी सोरापाडा येथील रुखमाबाई बालिकाश्रमातील विद्यार्थिनींशी संवाद साधला. याचवेळी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, सोरापाडा येथे इयत्ता अकरावीत शिक्षण घेणाऱ्या आचल धीरज वसावे हिची ‘एक दिवसाची जिल्हाधिकारी’ म्हणून निवड करण्यात आली. मंत्री तटकरे यांनी तिला स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसवून या अनोख्या अनुभवाची सुरुवात करून दिली.

यानंतर आचलने जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना भेट देत प्रशासकीय कामकाजाची माहिती जाणून घेतली. जिल्हा प्रशासनाचे कामकाज, निर्णय प्रक्रिया आणि अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेण्याची संधी तिला यानिमित्ताने मिळाली. दुर्गम भागातील मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबरच त्यांना प्रशासकीय सेवेकडे वळण्यासाठी प्रेरित करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी उपक्रमामागील भूमिका स्पष्ट केली. मुलींमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांना प्रशासकीय सेवेची ओळख व्हावी आणि भविष्यात उच्च पदांवर काम करण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, एक दिवसाची जिल्हाधिकारी बनलेल्या आचल वसावे हिनेही आपली भावना व्यक्त केली. “मला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सनदी अधिकारी व्हायचे आहे. त्यासाठी मी आतापासूनच तयारी करीत आहे,” असे तिने सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसण्याचा अनुभव भविष्यातील ध्येयपूर्तीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही तिच्या चेहऱ्यावरील आनंदातून व्यक्त होत होता.

या कार्यक्रमाला महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त माधवी सरदेशमुख, जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे, परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी पंकज पटले, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आनंद जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हरिभाऊ हाके आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT