नंदुरबार - एका महिलेने आधी किरकोळ मोबदला घेऊन तवा, कढई, कुकर, डबे यासारख्या वस्तू जुन्याच्या नव्या करून दिल्या, नंतर आमची कंपनी सोन्या-चांदीचे दागिने सुद्धा नवे करून देते, असे सांगून अनेक महिलांना लाखो रुपयात फसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तळोदा पोलीस ठाण्यात तीन महिलांकडील दीड लाखाचे सोन्याचे व चांदीचे दागिने, संसार उपयोगी वस्तू चोरून नेल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, विक्रेता बनून आलेल्या ठकबाज महिलेचे छायाचित्र एकाने गपचूप मोबाईल मध्ये काढले होते आणि आता पोलिसांच्या तपास कार्यात तोच प्रमुख धागा उपयोगाला येत असून पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत.
याविषयीचे सविस्तर वृत्त असे की, तळोदा तालुक्यातील अमलाड गावात मागील आठ दहा दिवसापासून अनिता नावाची अज्ञात महिला जुन्या वस्तूंच्या बदल्यात नव्या वस्तू देण्या च्या बहाण्याने घरोघर संपर्क करीत होती. प्रारंभी तिने डबा तवा कढई कुकर यासारख्या जुन्या वस्तू घेऊन नवीन आणून दिल्या. कोणत्याही जुन्या वस्तू द्या आमची कंपनी कमी पैशात नव्या करून देते अशी तिने थाप दिली. अवघ्या पन्नास शंभर रुपयात पितळाचे पातेले मोठ्या किमती लोखंडी कढया यासारख्या संसार उपयोगी वस्तू बदलवून देतानाच काही महिलांना पायातील चांदीचे जोडवे देखील तिने नवे आणून दिले. आम्ही सोन्याचे दागिने सुद्धा बदलवून देतो, अशीही थाप तिने दिली. प्राप्त माहितीनुसार मतीगुंग करण्याचे तंत्र सुद्धा लुबाडणाऱ्या महिलेने वापरले. निरोपाबाई नावाच्या महिलेला आपण घरातून काय काय काढून दिले हे त्यामुळेच लक्षातच आले नाही, असे सांगण्यात आले. निरोपाबाई विठ्ठल कोळी रा. आमलाड यांच्याकडील ४९ हजार २०० रु. कि. सोन्याचे व चांदीचे दागिने, २००० रु. कि. घरातील संसार उपयोगी वस्तु १ पितळी पातेले, ३ पितळी समई, १ पितळी तांब्या, २ पितळी ताटल्या, २ स्टिलचे कुकर, १ खलबत्ता, १ तवा, एक तगारी, १ कडई, १ पितळी परात, १ पितळी हंडा, ७ साडया १००० व ४ गारीचे कवर इतक्या वस्तू घरातून घेऊन गेली.
विशेष असे की, हे बघा या महिलेने मला इतक्या वस्तू दिल्या तुम्ही पण देऊ शकतात असे इतर महिलांना सांगून ती महिला फसवणूक करत राहिली. दागिने आणि वस्तू घेऊन गेलेली ती महिला नंतर परत आली नाही म्हणून आता सर्वांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
घडलेल्या या फसवणुकीविषयी तळोदा पोलीस ठाण्यात सपना विजेंद्र वळवी वय - ३७ रा. आमलाड तळोदा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. फिर्यादीत म्हटले आहे की, सपना विजेंद्र वळवी रा. आमलाड ता. तळोदा या महिलेकडील ५५ हजार २०० रु. कि. सोन्याचे व चांदीचे दागिने, ५०० रु. कि. ५ साडया तर, अनिताबाबाई संजय वळवी वय- ३८ रा. आमलाड यांच्याकडील ३५ हजार ४०० रु. कि. सोन्याचे व चांदीचे दागिने, ३५००/- रु. कि. घरातील संसार उपयोगी वस्तु १ पितळी हांडा, २ पितळी ताट, २ पितळी ताब्या, २ जर्मनच्या तगारी, १ कुकर, २ अॅल्युमिनयमच्या लहान पातेली, १ अल्युमिनियमचा डब्बा, १ बॅग इ. लंपास केले. असा एकुण १ लाख ४५ हजार ८०० रु. कि. मुद्देमाल या महिलेने लुबाडल्याची फिर्याद दाखल झाली आहे. जुन्याचे नवे करून देण्याची लालच देऊन आणखी किती जणांना फसवण्यात आले याचा शोध पोलीस घेत आहेत. तळोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी राजू लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल विजय जावरे अधिक तपास करीत आहेत.