नंदुरबार - नंदुरबार शहरात लागोपाठ घरफोडीच्या घटना घडत असतानाच एका शिक्षिकेच्या घरातून सुमारे 27 लाख 90 हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान फिंगरप्रिंट्स आणि श्वानपथकाच्या माध्यमातून चोरांचा माग काढण्यासाठी पोलीस पथक कार्यरत झाले आहेत. लाखो रुपयांचा ऐवज चोरीस गेल्याच्या घटना वरचेवर घडू लागल्यामुळे शहरवासींयात भिती पसरली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षिका असलेल्या निता बापुराव पाटील (वय-५०) या तळोदा रस्त्यावरील डिएसके अपार्टमेंट कुणालनगर नंदुरबार येथे प्लॉट क्र. २०३ मध्ये राहतात. त्यांची कन्या देखील शिक्षिका असून त्या मुली सोबतच त्या राहत आहेत. या चोरीमध्ये चोरांनी रोख रक्कम आणि दागिने तर नेलेतच परंतु बँक लॉकर्सच्या चाव्या, सराफाकडील पावत्या, रिकामी पर्स यासह झाडून सर्व नेले. घटना समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह उपनगर पोलीस ठाण्याचे व शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी देखील घटनास्थळी आले. अधिक तपासासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एस श्रवणदत्त यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु झाला आहे.
शिक्षिका निता पाटील यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्यात दि. २८/०२/२०२५ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वा. दरम्यान ही चोरी झाल्याचे म्हटले आहे. उपनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.