Shahada Minor Boys Drowned
नंदुरबार : मोबाईलवर रील बनवण्याचा आनंद घेताना तीन मित्रांपैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शहादा तालुक्यातील डोंगरगाव येथील दगड खाणीत घडली. दगड खाणीत निर्माण झालेल्या मानवनिर्मित तलावात खोलीचा अंदाज न आल्याने या तरुणांना आपला जीव गमवावा लागला.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी (दि. 21) दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान रितेश रामेश्वर वैदू (१६, शिवाजी नगर), राजरत्न दिनेश कुवर (वय १६, सिध्दार्थ नगर) आणि खुशाल चव्हाण (वय १५, रामनगर, शहादा) हे तिघे तरुण एका मोटरसायकलवरुन पोहण्याचा आनंद घेण्यासाठी डोंगरगाव येथे गेले होते.
त्या तलावात प्रथम रितेश त्यानंतर राजरत्न तलावात पोहण्यासाठी उतरला. तेव्हा त्यांचे रील बनवणे चालू होते. मात्र, तलावाची खोली जास्त असल्याचा अंदाज न आल्याने अचानक पाहता पाहता ते दोघे बुडाले. ही घटना साडेचार वाजेच्या सुमारास घडली.
खुशाल हा पाण्याबाहेर असल्याने त्याने लगेच आरडाओरड केला. आवाज ऐकून खाण कामगार व परिसरातील लोक धावून आले. मदत कार्य तातडीने सुरू करण्यात आले. पाण्यातून दोघांना काढल्यानंतर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले.
दरम्यान, शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात दोन्ही मुलांच्या मित्रांनी व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. दोन्ही अल्पवयीन मुलांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहून लोकांची मने हेलावून गेली.