नंदुरबार : रेती वाहतुक करणारे डंपर थांबवुन रॉयल्टीची (पावती) विचारणा केली एवढ्यावरून ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या थेट घरात घुसून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहे. वाळू माफियांकडून जीवाला धोका असल्याचे सांगत महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या नंदुरबार शाखेने काम बंद करण्याचा इशारा दिला असून रेती वाहणाऱ्या वाहनांची तपासणी करताना पोलीस बंदोबस्तासह जबाबदार अधिकाऱ्यांचे पथक सोबत देण्याची मागणी संतप्त झालेल्या सर्व तलाठ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. अन्य कर्मचारी संघटना स्तरावर देखील याचे पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तलाठी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मिताली सेठी यांची एकत्रित भेट घेऊन त्यांच्याकडे वाळू माफियां विषयीची कैफियत मांडली तसेच लेखी निवेदन सादर करीत वाळू माफियांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. या संदर्भात दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, वाहन अडवल्याचा विकास पवार यांना राग आला म्हणून त्यांनी 7-8 लोकासंमवेत हरीश पाटील यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांना जबर मारहाण केली. या घटनेने सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झाली आहे. सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांना अवैध गौण खनिज वाहनांची दररोज तपासणी व कार्यवाही करावी लागते. परंतु अशा पद्धतीने वाळू माफिया कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन मारहाण करत असल्यामुळे अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांना तपासणे व कार्यवाही करणे कर्मचाऱ्यांना शक्य होणार नाही. कारण कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका असल्याची भावना निर्माण झाली आहे.
यापुढे अवैध गौण खनिज वाहतूक तपासणी पथकासोबत 1 पोलीस कर्मचारी, 1 प्रादेशिक परिवहन कर्मचारी व नायब तहसिलदार दर्जाचा अधिकारी असल्याशिवाय अवैध गौण खनिज वाहतूक तपासणीचे काम केले जाणार नाही. तसेच वरील वाळू माफिया विकास पवार यांना तीन दिवसात अटक करण्यात आली नाही तर आम्ही सर्व बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. संघटनेचे अध्यक्ष झेड. के. गायकवाड, सचिव एन. के. राठोड, कार्याध्यक्ष के. डी. सुर्यवंशी, उपाध्यक्ष के.डी. कोकणी, सहसचिव ए.पी.ठाकरे, कोषाध्यक्ष.एन.ए.माळी यांच्यासह 35 स्वाक्षऱ्या निवेदनावर आहेत.
ग्राम महसुल अधिकारी हरीष बाळु पाटील रा. नंदुरबार यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की, मंगळवार (दि.28) रोजी दुपारी नंदुरबार तालुक्यातील शिंदगव्हाण ते काकर्दा रोडवर रेती वाहतूक करणाऱ्या डंपरला (क्र. MH- 39 AD- 1055) ग्राम महसुल अधिकारी हरीष बाळु पाटील यांनी थांबवले व त्यानंतर डंपर चालकाकडे रॉयल्टी (पावती)ची विचारणा केली. परंतु चालकाने कोणतेही अधिकृत कागदपत्र न दाखवता रेतीने भरलेली डंपर घेऊन तेथून पळ काढला. अधिकारी हर्षल पाटील यांनी डंपर का अडवले या गोष्टीचा राग आल्याने बुधवार (दि.29) रात्री 8.30 वा. वाळू माफिया विकास पवार हा सहा ते सात जणांसोबत घेऊन हरीश पाटील यांच्या घरात घुसला व शिवीगाळ करीत पुन्हा वाहन अडवले खोटया गुन्हयात अडकवून जिवे ठार मारुन टाकेल, असे धमकावले.
नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे