नंदुरबार : महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री व आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वावर आणि विकास धोरणावर विश्वास दाखवत धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील सहा गावांतील ग्रामस्थांनी एकत्रितपणे भारतीय जनता पक्षात सामील होत नवा राजकीय इतिहास घडवला आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच एका पेक्षा अधिक संपूर्ण गावांनी एकाच वेळी पक्षप्रवेश केल्याची ही ऐतिहासिक घटना आहे.
धडगाव तालुक्यातील बोरी गावात रविवार (दि.8) रोजी आयोजित कार्यक्रमात हा जम्बो स्वरूपातील पक्षप्रवेश पार पडला. भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात चिखली, बिलगाव, गेंदा माळ, सावऱ्यादिगर, गुंडान चाफळा आणि बोरी या गावांमधील ग्रामस्थांनी सामूहिक भाजपात पक्षप्रवेश केला.
या गावांचा समावेश काँग्रेसचे विद्यमान खासदार गोवाल पाडवी, माजी मंत्री के. सी. पाडवी आणि शिंदे गटाचे आमदार आमच्या पाडवी यांच्या प्रभाव क्षेत्रात होतो. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांनी भारतीय जनता पक्षात केलेला प्रवेश म्हणजे या नेत्यांविरोधातील नाराजीचा स्पष्ट संदेश मानला जात आहे.
ग्रामस्थांनी या वेळी सांगितले की, “गेल्या 35-40 वर्षांपासून रस्ते, वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी आम्ही प्रतीक्षा करत आहोत. मात्र, स्थानिक आमदारांनी याकडे कधीही लक्ष दिले नाही. आता आम्हाला मोदी सरकारच्या आणि डॉ. विजयकुमार गावित यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास वाटतो.”
या कार्यक्रमात भाषण करताना डॉ. विजयकुमार गावित म्हणाले, “जिल्हा निर्मितीपासूनच माझा उद्देश या अतिदुर्गम भागाचा कायापालट घडवण्याचा आहे. आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज, पाणी या सर्व सुविधा आदिवासी भागात पोहोचवण्यासाठी मी सातत्याने कार्यरत आहे. या गावांचाही विकास करून त्यांना योग्य न्याय मिळवून देईन.”
या वेळी भाजपचे नंदुरबार तालुकाध्यक्ष दीपक पाटील, धडगाव तालुकाध्यक्ष पिंट्या पावरा, सामाजिक कार्यकर्ते सुभाष आप्पा पावरा, भीमसिंग पाडवी, माजी नगराध्यक्ष लतिष मोरे यांच्यासह अनेक मान्यवर व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. महिलांचाही सहभाग मोठ्या संख्येने होता.