नंदुरबार

Nandurbar Police fraud : नंदुरबार पोलीस दलात महाघोटाळा? ४७ लाखांच्या अपहारप्रकरणी ७ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; खाकी वर्दीला मोठा धक्का

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, उपनगर पोलीस ठाणे, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे व मोटार परिवहन विभागातील एकूण सात तत्कालीन कर्मचाऱ्यांवर अपहाराचा गुन्हा नोंद करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित पोलीस अंमलदारांच्या पगाराव्यतिरिक्तची रक्कम आपल्या खात्यात जमा करून घेतल्याचा आणि त्या माध्यमातून ४७ लाख ६० हजार रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एवढ्या मोठ्या संख्येने पोलिसांवर गुन्हा दाखल होण्याची नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नंदुरबार येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील तत्कालीन कनिष्ठ श्रेणी लिपिक मनोज जगदीशगीर बुवा, वरिष्ठ श्रेणी लिपिक महेंद्र भगवान शिंदे, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यातील मयूर बाळू गवळी, तत्कालीन मपोहेकॉ. प्रीती फुलजी कोकणी, मपोशि. ज्ञानेश्वरी हरिश्चंद्र घुगे, पोशि. देवीदास पांडू गागडे, हेकॉ. किरण अर्जुन वळवी या सात जणांनी संगनमत करून अतिरिक्त वेतन स्वतःच्या फायद्यासाठी शासनाच्या 'सेवार्थ' प्रणालीमध्ये दाखल करून शासनाची दिशाभूल करत मंजूर करून घेतले. तसेच सदरची रक्कम पोलीस अंमलदार यांच्या पगार खात्यावर जमा करून स्वतःच्या फायद्यासाठी आपसात वाटून घेऊन शासनाचा एकूण ४७ लाख ६० हजार रुपयांचा अपहार केला.

सन २०२३ ते २०२४ या कालावधीत हा अपहाराचा प्रकार घडला आहे. कनिष्ठ श्रेणी लिपिक मनोज बुवा हे २०१५ पासून ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत वेतन लिपिक या पदावर कार्यरत असताना त्यांनी सदर अपहार केला. पोकॉ. मयूर गवळी यांना १२ लाख रुपये, मपोहेकॉ. प्रीती कोकणी यांना ६ लाख रुपये, मपोशि. ज्ञानेश्वरी घुगे यांना ६ लाख रुपये, पोशि. देवीदास गागडे यांना ६ लाख रुपये, पोहेकॉ. किरण वळवी यांना ६ लाख रुपये असे एकूण ३६ लाख रुपये पहिल्या टप्प्यात; तर वरिष्ठ श्रेणी लिपिक महेंद्र भगवान शिंदे हे सप्टेंबर २०२३ ते मे २०२६ या कालावधीत नेमणुकीस असताना पोकॉ. मयूर गवळी यांना २ लाख ९० हजार रुपये, पोशि. देवीदास गागडे यांना ३ लाख २० हजार रुपये, पोशि. ज्ञानेश्वरी घुगे यांना २ लाख ५० हजार रुपये, पोहेकॉ. किरण वळवी यांना ३ लाख रुपये असे एकूण ११ लाख ६० हजार रुपये दुसऱ्या टप्प्यात, असे दोन्ही टप्पे मिळून ४७ लाख ६० हजार रुपयांचा अपहार केला. सदर रक्कम सातही जणांनी आपसात वाटून घेतली.

याबाबत संदीप काशिनाथ सोनवणे यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज जगदीशगीर बुवा (तत्कालीन नेमणूक - पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार, सध्या नेमणूक - पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे), महेंद्र भगवान शिंदे (नेमणूक - पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार), पोकॉ. मयूर बाळू गवळी (नेमणूक - नंदुरबार तालुका पोलीस ठाणे), मपोहेकॉ. प्रीती फुलजी कोकणी (तत्कालीन नेमणूक - नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे, सध्या नेमणूक - सीसीटीएनएस कक्ष नंदुरबार), मपोशि. ज्ञानेश्वरी हरिश्चंद्र घुगे (नेमणूक - उपनगर पोलीस ठाणे, नंदुरबार, सध्या नेमणूक - पुणे शहर पोलीस आयुक्तालय), पोशि. देवीदास पांडू गागडे (तत्कालीन नेमणूक - उपनगर पोलीस ठाणे, नंदुरबार, सध्या नेमणूक - मोटार परिवहन विभाग नंदुरबार), पोहेकॉ. किरण अर्जुन वळवी (तत्कालीन नेमणूक - धडगाव पोलीस ठाणे, सध्या नेमणूक - मोटार परिवहन विभाग नंदुरबार) या सात जणांविरुद्ध भा.न्या.सं. चे कलम ३१६ (५), ३१८ (४), ३३६ (२) (३), ३४० (२), ३४४, २२८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वास भान्सी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT