नंदुरबार - नदी काठावरील डबक्यात अंघोळीसाठी उतरले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे पाच ते सहा वयोगटातील 3 कोवळ्या बालकांचा बुडून मृत्यू झाला. हृदय हेलावून टाकणारी ही दुर्घटना अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा काठच्या अतिदुर्गम भागातील गमन केली पाडा येथे आज दिनांक ९ जून रोजी घडली.
या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसर शोकमग्न झाला असून संबंधित कुटुंबांवर दुःखाचा अक्षरशः डोंगर कोसळला आहे. सुनील खेता वसावे (वय ६ वर्षे), नितेश आंब्रे वसावे (वय ७ वर्षे) आणि शुभम कैलास वसावे (वय ६ वर्षे) अशी मृत बालकांची नावे आहेत. हे दुर्घटना आज दिनांक 9 जून 2026 रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली.
दरम्यान, धावून आलेल्या ग्रामस्थांकडून घटनेची माहिती तात्काळ प्रशासनाला देण्यात आली. मात्र, घटना घडून बराच कालावधी उलटूनही संबंधित कुटुंबांना कोणत्याही प्रकारची शासकीय मदत अथवा दिलासा मिळाला नाही अशी तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी केली. प्राप्त माहितीनसार मोलगी येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रात्री उशिरा बालकांचे शव हलविण्यात आले.
या अत्यंत गंभीर आणि वेदनादायी घटनेची कोणत्याही स्थानिक अधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आली नसल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली.
या घटनेबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून मृत बालकांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत, विशेष सहाय्य व शासनाच्या सर्व उपलब्ध योजनांचा लाभ देण्याची जोरदार मागणी केली आहे. यासाठी तहसीलदार, महसूल प्रशासन, आदिवासी विकास विभाग तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माझी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांना घटना कळताच त्यांनी मुंबई येथून दूरध्वनी द्वारे अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून योग्य ते सहकार्य देण्याच्या सूचना केल्या.
घटनेबाबत प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरसग वसावे म्हणाले की, मृत्यूमुखी पडलेली तिन्ही बालके अत्यंत गरीब आदिवासी कुटुंबातील आहेत. दुर्गम भाग, मूलभूत सुविधांचा अभाव आणि आपत्कालीन यंत्रणांच्या मर्यादा यामुळे या घटनेकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. अशा दुःखद प्रसंगी शासन आणि प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत तात्काळ मदत जाहीर करणे, ही त्यांची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी आहे. जिल्हा प्रशासन, आदिवासी विकास विभाग आणि राज्य शासनाने या घटनेची तातडीने दखल घेऊन मृत बालकांच्या कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत द्यावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी किरसिंग वसावे यांनी केली आहे