नवापूर एमआयडीसी परिसरात बनावट तूप तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली Pudhari
नंदुरबार

Nandurbar Crime | नवापूर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; 1.46 कोटींचा मुद्देमाल जप्त

अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली

पुढारी वृत्तसेवा

Navapur MIDC fake ghee factory raid

नंदुरबार : जिल्ह्यातील नवापूर एमआयडीसी परिसरात बनावट तूप तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 1 कोटी 46 लाख 56 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीतून हा प्रकार उघडकीस येणे अपेक्षित असताना, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 मार्च 2026 रोजी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना नवापुर एमआयडीसी परिसरात बनावट तूप तयार करून विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवून संबंधित अधिकारी व पंचांच्या उपस्थितीत एमआयडीसीतील एका कारखान्यावर छापा टाकण्यात आला.

कारवाईदरम्यान पाम तेल, वनस्पती तूप, विविध रासायनिक पदार्थ व फ्लेवर यांचा वापर करून गायीच्या तुपासारखा रंग व सुगंध निर्माण करत बनावट तूप तयार केले जात असल्याचे आढळले. हे तूप ORIA COW GHEE, SHUBH PREMIUM COW GHEE, LABH COW GHEE, RADHE KRISHNA COW GHEE आदी ब्रँडच्या नावाने पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याची माहिती तपासात समोर आली.

छाप्यात पाम तेल, बनावट तूपाने भरलेले डबे, विविध क्षमतेच्या स्टोरेज टाक्या, पॅकिंग मशीन, प्रिंटिंग मशीन, बॉयलर, इलेक्ट्रिक मोटर्स, गॅस सिलिंडर, रासायनिक फ्लेवर, बीटा-कॅरोटीन तसेच इतर साहित्य असा एकूण 1,46,56,370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी कोणताही परवाना नसताना भेसळयुक्त व मानवी आरोग्यास घातक असे पामतेल व तूप तयार केल्याप्रकरणी राकेशभाई ईश्वरभाई भरतिया (वय 47, रा. सुरत, गुजरात) यांच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 274 तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. व अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ आणि त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT