Nandurbar Municipal Election 
नंदुरबार

Nandurbar Municipal Election | निवडणूक कार्यकर्त्यांची स्पर्धा मात्र नेत्यांची!

नंदुरबार जिल्ह्यातील पालिका निवडणुकीचे चित्र

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार : दीर्घ प्रतीक्षेनंतर नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा या चार नगरपालिका क्षेत्रातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. महायुती किंवा महाआघाडीचे गणित जुळलेले नाहीत परिणामी नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण असणार याची पूर्ण स्पष्टता अद्याप झालेली नाही. तथापि प्रत्येक पक्षाने आपापल्या इच्छुक उमेदवार यांच्या मुलाखती सुरू केल्या आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडी चे घटकपक्ष एकत्र येऊन लढणार किंवा नाही याची स्पष्टता नसल्याने नगराध्यक्ष पदाच्या आणि नगरसेवक पदाच्या मैदानात बहुरंगी लढती रंगतील, असे प्राथमिक चित्र आहे. दीर्घ कालावधीनंतर नगरपालिका निवडणुका होत असताना प्रत्येक नगरपालिका क्षेत्रातील राजकीय समीकरणे कमालीची बदललेली आहेत शिवाय निवडणूक कार्यकर्त्यांची, स्पर्धा मात्र नेत्यांची; रंगली आहे. हे आत्ताच्या राजकीय वातावरणाचे मोठे वैशिष्ट्य सांगता येईल. निवडणुकीची अधिसूचना १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. त्यामुळे त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. यामुळे आता फक्त बैठकांचे गुऱ्हाळ चालू आहे.

नंदुरबारला पारंपारिक विरोधाचीच लढाई

सर्वाधिक चुरस नंदुरबार नगरपालिकेच्या निवडणुकीत राहणार आहे. नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षात खरी लढत होणार आहे. परंतु अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि काँग्रेसपक्षाने सुद्धा स्वतंत्र पॅनल उभे करण्याची तयारी केल्यास चौरंगी लढत होऊ शकते. नंदुरबारची पार्श्वभूमी अशी की, नंदुरबार नगरपालिकेवर मागील 22 वर्षापासून एकनाथ शिंदे गटाचे विद्यमान नेते विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांची सत्ता आहे.दरम्यान, गेल्यावेळी ३९ असलेली सदस्यसंख्या यावेळी ४१वर गेली आहे. प्रभागदेखील १९ ते २० झाले आहेत. नंदुरबार पालिका जिल्ह्यात सर्वात मोठी पालिका आहे. अ वर्ग दर्जा असलेल्या पालिकेतील मतदारसंख्या तब्बल एक लाख ११ हजार ९९ इतकी आहे.

येथे सत्तापालट घडावा असा प्रयत्न भाजपाचे नेते तथा माजी आदिवासी विकासमंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित हे सातत्याने करीत आले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी यंदा त्यासाठी शक्ती लावली आहे. कारण माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित आणि रघुवंशी परिवाराचे पारंपारिक राजकीय वैर आहे. शिवाय महायुती मधील घटकपक्ष असताना सुद्धा रघुवंशी यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराविरोधात प्रचार केला; याचा रोष भारतीय जनता पार्टीतील नेत्यांमध्ये आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढेल असे वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे.

या दोन्ही पक्षातून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल? याविषयी सध्या मोठी उत्सुकता आहे. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी सौ रत्ना रघुवंशी मागील वीस वर्षापासून नगराध्यक्षा आहेत तथापि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या प्रकृती अस्वास्थ्मुळे सौ रत्ना रघुवंशी यंदा उमेदवारी करू शकतील का यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यांचे भाचे किरण उर्फ गोलू रघुवंशी यांचे नाव पर्याय म्हणून चर्चेत आलेले आहे. मात्र त्याबद्दल अजून स्पष्टता नाही. 2017 च्या मागील निवडणुकीत ज्यांनी रघुवंशी गटाला जबर टक्कर देत विरोधात निवडणूक लढवली होती ते भाजपातील माजी आमदार शिरीष चौधरी आणि त्यांचे बंधू उद्योजक डॉक्टर रवी बापू चौधरी यांचा पूर्ण गट आता एकनाथराव शिंदे गटाच्या शिवसेनेत आला असून रघुवंशी यांच्या सोबत आहे. परिणामी रघुवंशी यांच्या विरोधातील तो संघर्ष कमी झाला आहे. अशातच भाजपा युवा नेते डॉक्टर विक्रांत मोरे यांच्या भूमिकेबद्दल सध्या सर्वत्र उत्सुकता आहे.

इकडे भारतीय जनता पार्टीतून सुद्धा कोअर कमिटीच्या दोन-तीन बैठका पार पडल्यानंतर सुद्धा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित झालेला नाही. भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या पत्नी सौ वैशाली चौधरी, शहर महामंत्री सदानंद रघुवंशी, ओबीसी सेलचे माजी अध्यक्ष अविनाश माळी, भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी ही चार नावे भाजपा प्रदेश समितीकडे विचाराधीन असल्याचे सांगण्यात येते तथापि सदानंद रघुवंशी यांचे नाव फायनल होईल अशी चर्चा आहे. डॉक्टर गावित गट, महामंत्री विजय चौधरी यांचा गट आणि यांचा गट असे स्वतंत्र गट भाजपात कार्यरत असल्याचे सध्या पाहायला मिळते. यामुळे नगरसेवक पदाचे उमेदवार देताना स्पर्धा राहील असे स्पष्ट दिसते.

नवापूर येथील लढत

नवापूर हा वर्षानुवर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. काही वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसने नवापूर नगरपालिकेत सत्ता स्थापन केली तेवढा अपवाद वगळता माजी मंत्री स्वरूप सिंग नाईक आणि त्यांचे पुत्र आमदार शिरीष नाईक यांच्याकडेच नवापूर नगरपालिकेचे सत्ता राहिली आहे.२०१७ च्या मागील निवडणुकीत काँग्रेसच्या हेमलता अजय पाटील यांनी सर्वाधिक ७,९११ मते घेऊन आघाडी मिळवून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून यश मिळविले होते. आता आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. परंतु काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात आहेत. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे; परंतु भाजप आणि इतर पक्षांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. एकूणच, नवापुरातही अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची होणार, यात शंका नाही.

तळोद्यात भाजपाची प्रतिष्ठा पणाला

तळोदा नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची बनली असून इथे भाजपाचे प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भारतीय जनता पार्टीचे आमदार राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात तळोदा नगरपालिका निवडणूक लढवली जात असल्यामुळे पक्षातील गट तट सांभाळून मित्रपक्षांना ते कसा न्याय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तळोदा, नगरपालिकेचे

नगराध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी निघाल्यानंतर सर्वच इच्छुकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. त्यातही सर्वच राजकीय पक्षांकडून शहरातील हेविवेट उमेदवारी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा ठाम निर्धार केल्याने पालिकेच्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सत्ताधारी महायुतीतील व विरोधी महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून युतीबाबत अजूनही चित्र स्पष्ट न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.

येथील पार्श्वभूमी अशी की, सध्या पालिका भाजपच्या ताब्यात होती. कारण लोकनियुक्त नगराध्यक्ष भाजपचा होता. शिवाय ८ सदस्यीय पालिकेत ११ भाजप, ६ काँग्रेस व एक शिवसेना असे बलाबल होते. मात्र एक नगरसेवक वगळता पाच जणांनी पक्षांतर केले आहे. काँग्रेसच्या पाच नगरसेवकांपैकी तिघांनी भाजपत तर दोघांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेनेची एकमेव नगरसेविका शिवसेना शिंदे गटात सामील झाली आहे. सत्ताधारी महायुती घटक भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची व विरोधी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये अजूनही युतीबाबत खलबते होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.

तळोद्यातील मोठे वैशिष्ट्य असे की जेव्हा, जेव्हा सरकारने नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षाचा निर्णय जाहीर केला त्या त्यावेळी तळोदा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपलाच तळोदावासीयांनी संधी दिली आहे. १९७८ मध्ये पहिल्यांदा गुलाल बुलाखी माळी लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले होते. त्यानंतर २००७ मध्ये विमलबाई सोनवणे होत्या, तर २०१७मध्ये अजय परदेशी होते. आता यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष कोण विराजमान होईल याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

शहाद्यात साडेचार वर्षानंतर निवडणूक

शहादा नगरपरिषदेची तब्बल वर्षांनंतर निवडणूक होत असल्याने राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. इतिहास म्हणावा एवढा मोठ्या कालावधीपर्यंत इथे प्रशासकीय सत्ता चालली. २९ डिसेंबर २०२१ रोजी संपल्यानंतर पालिकेवर प्रशासकराज सुरू झाले होते. तब्बल चार वर्षांपासून पालिकेचा कारभार प्रशासक पाहत आहेत. सगळ्याच पक्षांकडे अस्पष्टता असल्यामुळे नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. राजकीय पक्षांनी सावध भूमिका घेत अद्याप काहीही जाहीर केले नसले तरी अपक्ष उमेदवारांनी स्वतंत्ररीत्या प्रचार सुरू केल्याने संपूर्ण शहराचे वातावरण निवडणूकमय झाले आहे.

डिसेंबर २०१६ ला पालिकेची निवडणूक झाली होती, त्यानंतर पाच वर्षांच्या सत्ता कालावधीत सत्ताधारी भाजप व विरोधी पक्ष काँग्रेस यांनी शहराचा कारभार पाहिला त्यांना एमआयएम राष्ट्रवादी व अपक्ष यांनी सहकार्य केल्याने पाच वर्षे बिनविरोध कामकाज झाले. आता मात्र तत्कालीन सर्व समीकरणे बदलली आहेत. तत्कालीन सत्ताधारी भाजपचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील व त्यांचे पुत्र अभिजीत पाटील सध्या कुठल्याही पक्षात नाही. शेतकरी विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहे. भाजपाचे शहाद्यातील आमदार राजेश पाडवी यांच्याशी मागील काही काळापासून अभिजीत पाटील यांनी जवळीक ठेवली आहे त्यामुळे आमदार राजेश पाडवी यांचे बळ अभिजीत पाटील यांना लाभेल का हा उत्सुकतेचा भाग राहणार आहे. परंतु त्याचवेळी भाजपाचे नेते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या ठिकाणी भाजपाला बळ दिले आहे. पालिकेतील काँग्रेसचे गटनेता प्रा. मकरंद पाटील हे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष असून, भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रबळ दावेदार आहेत, तर गत निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून क्रमांक दोनची मते मिळविणारे शेख जहीर शेख मुशीर हे सध्या शिवसेना शिंदे गटात सामील आहेत. त्यांना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे बळ लाभणार आहे. परिणामी, या प्रमुख उमेदवारांची राजकीय परिस्थिती बदलली असली तरी प्रमुख स्पर्धा कायम आहे, अशात माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कट्टर समर्थक जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे यांनी शहादा पालिकेची निवडणूक लढविण्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, कुठल्या पक्षातर्फे अथवा अपक्ष लढविणार हे जाहीर केलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT