Nandurbar mob lynching news
नंदुरबार : नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथे मुले पळवणारा समजून एका बेघर व्यक्तीला जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल रोजी रघुभाई रामविरसिंग पटेल (वय ५५, रा. लालोर, जि. भेंड, मध्यप्रदेश) या बेघर व्यक्तीला काही जणांनी संशयावरून मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तीला सुरक्षितपणे ताब्यात घेत वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक तपासात सदर व्यक्ती कोणत्याही गुन्हेगारी कृत्यात सहभागी नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या त्यांना नंदुरबार येथील आधार बेघर निवारा केंद्रात हलविण्यात आले आहे.
या प्रकरणी अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेत मारहाण करणाऱ्या ५ ते ६ अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १८९(२) व ११५(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, जिल्ह्यात मुले पळवणाऱ्या टोळीबाबत अफवा पसरत असल्याने अशा घटना वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. याआधी तळोदा येथेही दोन व्यक्तींना जमावाने मारहाण करून त्यांचे वाहन जाळल्याची घटना घडली होती.
पोलीस अधीक्षकांचे आवाहन
जिल्हा पोलीस अधीक्षक एस. श्रवण दत्त यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर अशा प्रकारच्या अफवा पसरवणे टाळावे. कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची खातरजमा करावी.
अफवा पसरवणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा असून, अशा कृत्यात सहभागी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच, कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा आपत्कालीन क्रमांक ११२ वर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.