नंदुरबार: जिल्ह्यात उन्हाचा कहर सुरूच असून तापमानाने ४२ ते ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. या जीवघेण्या उष्णतेचा फटका केवळ मानवी जीवनालाच नव्हे, तर विद्युत यंत्रणेलाही बसला आहे. प्रचंड उन्हामुळे महावितरणचे ट्रान्सफॉर्मर्स (रोहित्र) आणि वीजवाहिन्या चक्क पेट घेत असल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा अक्षरशः धगधगत आहे. वाढत्या तापमानामुळे यंत्रणेवर ताण आल्याने नंदुरबार, शहादा आणि तळोदा भागात विद्युत रोहित्र निकामी होण्याचे व वीज तारा जळण्याचे प्रकार घडले आहेत. याचा थेट परिणाम वीज पुरवठ्यावर झाला असून, ऐन उकाड्याच्या रात्री तासनतास वीज गुल होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
सकाळी ११ वाजेपासूनच उन्हाच्या झळा असह्य होत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दिवसा उन्हाचे चटके आणि रात्री वीज नसल्याने होणारा उकाडा यामुळे जनतेचा संयम सुटत चालला असून, प्रशासनाविरुद्ध संतप्त भावना व्यक्त होत आहेत. आज दिवसभरात काही काळ ऊन-सावलीचे वातावरण निर्माण झाल्याने तापमानात किंचित घट जाणवली, मात्र उष्णतेची लाट कायम आहे.
वाढत्या उष्म्यामुळे उष्माघाताचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाने विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.