नंदुरबार : जिल्ह्यातील शहादा येथील वन विभागाच्या लाकूड विभागाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे लाकूड जळून खाक झाले आहे. शनिवार (दि.22) रोजी दुपारी चार वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न चालू होते. धडगाव तालुक्यातील वनक्षेत्रात वणवा पेटल्याची घटना ताजी असतानाच वनविभागाशी संबंधित ही दुसरी घटना घडली आहे.
शनिवार (दि.22) रोजी सारंगखेडा शहादा रस्त्यावरील शहादा वनपरिक्षेत्र कार्यालया अंतर्गत असलेल्या लाकूड विभागाला अचानक आग लागली. मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ आणि धूर पसरल्यानंतर लोकांच्या निदर्शनास आले. वनविभागाच्या अखत्यारित असलेला हा संपूर्ण परिसर टनोगंती लाकडाने व्यापलेला आहे. जप्त केलेले हजारो टन लाकूड येथे साठवलेले असते. त्यापैकी बराचसा भाग आगीच्या भक्षस्थानी सापडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तथापी संबंधित अधिकारी व कर्मचारी आणि त्या परिसरातील लोकांनी धावा धाव करून अग्नी बंब बोलावून आगीवर नियंत्रण मिळवले आहे. परंतु, आग कशामुळे लागली आणि नुकसान किती झाले याबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही.
दरम्यान, वन विभागाशी संबंधित आग लागल्याची ही दुसरी घटना घडल्यामुळे परिसरात वनविभागाबाबत चर्चेचा विषय बनली आहे. धडगाव वनक्षेत्रात डोंगर पेटण्याची घटना नुकतीच घडली आहे. नर्मदा काठावरील गवताळ डोंगराला 17 मार्च 2025 रोजी आग लागली होती, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. परंतु, वन विभागाकडून मात्र दिनांक 19 मार्च 2025 रोजी आगे ची घटना निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले आहे.
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, धडगाव वनक्षेत्रातील आमला, आचपा, तीनसमाळ या परिसरात आग लागल्याची माहिती स्थानिकांनी वनविभागाला दिली होती. शुक्रवार (दि.21) रोजी रात्रीपासून लागलेली आग शनिवार (दि.22) रोजी दुपारी भीषण झाल्याने काही वेळातच आठ ते दहा किलोमीटरचे जंगल बेचिराख झाले. नर्मदा काठापासून पेटलेला वणवा गुरुवारी (दि.22) रोजी दुपारपर्यंत तालुक्यातील उमराणी वनक्षेत्रापर्यंत पोहोचला होता. तब्बल तीन दिवस सातपुड्यातील डोंगर धुमसत राहिले होते. वनविभागाकडून मात्र पारंपरिक उपाययोजना करून आग विझवण्याचा प्रयत्न झाला. परिणामी शेकडोच्या संख्येने सागा सारखी मौल्यवान किमती झाडे जळाल्याचा अंदाज आहे. तथापी नैसर्गिक साधनसंपत्तीचे किती प्रमाणात नुकसान झाले याची माहिती घेणे चालू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.