नंदुरबार - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनामार्फत नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा येथील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान मिथ्याछाप व भेसळयुक्त असल्याचा संशय असलेला नमकीन व मसाल्यांचा सुमारे 10 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त (अन्न) सपना गोडसे पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दि. 24 व 25 ऑक्टोबर 2026रोजी नंदुरबार शहरासह शहादा व अक्कलकुवा येथील काही हॉटेल्स आणि मसाल्यांच्या दुकानांची तपासणी करुन नमकीन व मसाल्यांचा सुमारे 10 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
यावेळी संशयित नमकीन व मसाल्यांचे नमुने घेऊन ते विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार संबंधितांविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई नंदुरबार कार्यालयाच्या सहायक आयुक्त सपना गोडसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी तुषार देवरे, सुरेंद्र डौले आणि संकेत सदाफुले यांनी केली.
अन्न व्यवसायिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
अन्न व्यवसायिकांना अन्न पदार्थांमधील भेसळ टाळावी, खाद्यपदार्थांमध्ये अनधिकृत कृत्रिम रंगांचा वापर करू नये, तसेच मिठाईमध्ये रंगांचा वापर निर्धारित Permissible Limit मर्यादेतच करावा. हॉटेल व्यावसायिकांनी खाद्यपदार्थ तळण्यासाठी तेच तेल वारंवार वापरणे टाळावे. अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन आढळल्यास संबंधित दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
दिवाळीच्या काळात स्टॉल लावून खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनीही नियमानुसार अन्न व्यवसाय नोंदणी किंवा परवाना घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व विक्रेत्यांनी आवश्यक नोंदणी व परवाना घेऊनच व्यवसाय करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.