गुजरात राज्यातील डेडीयापाडा येथे देव मोगरा माता मंदिराच्या विश्वस्तांसोबत गावित यांची बैठक  Pudhari
नंदुरबार

Heena Gavit | वन कायद्यांतील अडथळे दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसराचा विकास करणार : डॉ. हिना गावित

गुजरात राज्यातील डेडीयापाडा येथे देव मोगरा माता मंदिराच्या विश्वस्तांसोबत गावित यांची बैठक

पुढारी वृत्तसेवा

Dev Mogra Mata Temple Development

नंदुरबार : आदिवासी समाजाचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या याहा मोगी देवी अर्थात देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासकामांना वन खात्याच्या कायद्यांमुळे येणारे अडथळे दूर करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही भारतीय जनता पक्षाच्या माजी खासदार डॉ. हिनाताई गावित यांनी दिली.

गुजरात राज्यातील डेडीयापाडा येथे असलेल्या देव मोगरा माता मंदिराच्या विश्वस्तांसोबत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या तीन राज्यांतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी निवास व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र भवनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

मात्र, वन विभागाच्या जमिनीशी संबंधित कायदेशीर अडचणींमुळे या कामाला विलंब होत असल्याचे यावेळी चर्चेत आले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आवश्यक सहकार्य मिळवून देण्यासाठी तसेच विकासकामांतील अडथळे दूर करण्यासाठी नवी दिल्ली येथे भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे आश्वासन डॉ. हिनाताई गावित यांनी दिले. बैठकीदरम्यान त्यांनी मंदिर परिसरातील सुविधा, भाविकांची वाढती संख्या आणि प्रस्तावित विकासकामांबाबत विश्वस्तांकडून सविस्तर माहिती घेतली.

आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीसाठी देवीचरणी प्रार्थना

दरम्यान, नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार, माजी आदिवासी विकास मंत्री तसेच भाजपाचे विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी डॉ. हिनाताई गावित यांनी देव मोगरा माता मंदिरात जाऊन देवीच्या चरणी प्रार्थना केली. पारंपरिक विधीनुसार पूजन करत त्यांनी आदिवासी समाजाच्या कुलदैवताप्रती श्रद्धा व्यक्त केली.

यावेळी देव मोगरा माता मंदिराचे उपाध्यक्ष कांतीभाई कोठारी, गुरुजी दिलीपभाई वासावा, सचिव नानसिंगभाई वसावा, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश दादा पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष नितेश पाडवी, अमृतभाऊ चौधरी तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT