नंदुरबार : जिल्हा पोलीस दलाने वाहन चोरीच्या घटनांविरुद्ध मोठी मोहीम उघडली असून, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत धुमाकूळ घालणाऱ्या एका आंतरराज्य दुचाकी चोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी १८ दुचाकी जप्त केल्या असून, सुमारे ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
फेब्रुवारी महिन्यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलिसांना एका संशयित वाहन चालकावर शंका आली. वाहन तपासणी दरम्यान, संबंधित व्यक्तीकडे दुचाकीची कोणतीही कागदपत्रे नव्हती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, त्याने वाहन चोरीची कबुली दिली आणि आपल्या दोन साथीदारांची नावे उघड केली.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथून आणखी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. या टोळीने केवळ नंदुरबारच नव्हे, तर धुळे जिल्हा, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या धडक कारवाईबाबत माहिती देताना नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त एस. म्हणाले की, "वाहन तपासणी दरम्यान एका इसमाकडे कागदपत्रे नसल्याने संशय बळावला. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२४ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत हे मोठे रॅकेट असल्याचे समोर आले. जप्त केलेल्या १८ दुचाकींपैकी काही नंदुरबारमधील आहेत, तर काही शेजारील राज्यातील आहेत. संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून या दुचाकी मूळ मालकांना सोपवण्याची प्रक्रिया सुरू आहे."
जप्त मुद्देमाल: १८ दुचाकी (किंमत ६ लाख ४० हजार रुपये).
कार्यक्षेत्र: महाराष्ट्र (नंदुरबार, धुळे), मध्य प्रदेश आणि गुजरात.
पुढील तपास: या टोळीला आणखी कोणी मदत केली आहे का? आणि त्यांनी अजून किती ठिकाणी चोरी केली आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.
या कारवाईमुळे वाहन चोरट्यांचे धाबे दणाणले असून, आगामी काळात आणखी काही मोठ्या गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.