नंदुरबार : “काँग्रेसच्या राजवटीत संविधान दिवस कधीच साजरा झाला नाही, मात्र महायुती सरकार संविधान दिन साजरा करत आहे”, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी केली.
छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. त्यांनी सांगितले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सतर्कतेने काम करावे. पक्षात कार्यकर्त्यांना सन्मान मिळेल आणि निवडणुकीसाठी पूर्ण ताकद दिली जाईल.
तटकरे म्हणाले की, जिल्ह्यातील डोकारे सहकारी साखर कारखान्याच्या समस्या बैठकीतून सोडवण्यात येतील. आदिवासी समाज स्वाभिमानाने शेती करत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा ताकदीने उभी राहत आहे.
अनिल पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत सहकार्य करणाऱ्या पक्षाने जो धक्का दिला, तो पुन्हा सहन केला जाणार नाही. “ताकदवान कार्यकर्त्यांना संधी देताना महायुतीचा विचारही केला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
रुपाली चाकणकर यांनी विरोधकांनी 'लाडकी बहिण' योजनेवर कितीही टीका केली, तरीही ती योजना कधीच बंद होणार नाही, असे आश्वासन दिले.
या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या संघटन कौशल्याचे सर्वांनी कौतुक केले.