नंदुरबार: शेतजमिनीच्या कागदपत्रांच्या नकला देण्यासाठी ८०० रुपयांची लाच स्वीकारताना नवापूर येथील भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी झालेल्या या कारवाईमुळे शासकीय कार्यालयांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राजेंद्र अरविंद पाटील (वय ३६) असे अटक करण्यात आलेल्या शिपायाचे नाव आहे.
एका शेतकऱ्याने आपल्या कुकराण येथील जमिनीच्या चतु:सीमा, एकत्रीकरण व आकारबंद अशा दस्तऐवजांच्या प्रतींसाठी अर्ज केला होता. त्यावेळी शिपाई पाटील याने कामाच्या मोबदल्यात १००० रुपयांची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने १३ ऑगस्ट रोजी एसीबीकडे धाव घेतली. पडताळणी दरम्यान, तडजोडीअंती ८०० रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार आज, १९ ऑगस्ट रोजी नवापूर भूमी अभिलेख कार्यालयात पंचांसमक्ष पाटील याने लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला जाळ्यात अडकवले.
या कारवाईनंतर पाटील याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरोधात नवापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. "हा शिपाई वरिष्ठांच्या सांगण्यावरून लाच घेत होता का, याचा तपास करण्यासाठी त्याचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. तसेच, त्याच्या घराची झडतीही घेतली जात आहे," असे एसीबीने स्पष्ट केले आहे. या प्रकरणामुळे मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या कारवाईमुळे लाचखोर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.