मुलावर वारंवार अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. File
नंदुरबार

Nandurbar Crime : नंदुरबार हादरले! बाल लैंगिक शोषण प्रकरण; तीन पीडित मुलांनी कथन केली आपबिती

पोलिसांच्या आवाहनाला मोठे यश

पुढारी वृत्तसेवा

नंदुरबार : येथील अल्पवयीन बालकांच्या लैंगिक शोषणाशी संबंधित बहुचर्चित प्रकरणात तपासाला मोठे यश मिळाले आहे. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंगळवारी (दि.११) तीन पीडित मुलांनी थेट शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधत आपली आपबीती पोलिसांसमोर कथन केली. या घडामोडीमुळे आरोपीवर आणखी स्वतंत्र गुन्हे दाखल होणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा प्रमुख चित्रा वाघ यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून, पोलिसांनी स्वतःहून दखल घेऊन केलेल्या तातडीच्या कारवाईचे कौतुक केले असून, सदर प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पीडित मुले आपबिती कथन करायला पुढे आले असले तरी त्या पीडित मुलांची अथवा त्यांच्या पालकांची कोणतीही माहिती बाहेर येऊ नये, या दृष्टीने शहर पोलिसांकडून पूर्ण गोपनीयता राखली जात आहे.

नंदुरबार येथील रायसिंग पुरा भागात राहणारा चेतन प्रकाश कोळी नावाचा हा नराधम अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ बनवायचा त्यानंतर ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करायचा. याची सुत्रांकडून माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांनी शुक्रवारी (दि.७) जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, उपअधीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात तातडीने पथक तयार केले. त्यानंतर त्या तरुणाला अटक केली. तेव्हा संपूर्ण शहराला हादरवून सोडणारा हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

आरोपीच्या मोबाईलमधून अल्पवयीन मुलांवर व समवयीन तरूणांवर अत्याचार केल्याचे अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत . न्यायालयाने त्याला १२ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती, ती आता पूर्ण होत असल्याने आता पुन्हा शहर पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी न्यायालयात मांडली जाणार आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख व त्यांचे पथक करीत आहे.

आणखी पीडित मुले पुढे येणार?

दरम्यान, शहर पोलिसांनी आरोपी कोळी याच्या जप्त केलेल्या मोबाईलमधील व्हिडिओ तपासणे सुरू ठेवले असून पीडित मुलांची ओळख पटवणे अद्याप सुरू आहे. आतापर्यंतच्या तपासादरम्यान अनेक बालके व युवक या प्रकारच्या शोषणास बळी पडल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. तथापि कोणी तक्रार देण्यासाठी अथवा ओळख पटवण्यासाठी पुढे येत नव्हते म्हणून सोमवारी (दि.१०) नंदुरबार शहर पोलिसांकडून न घाबरता माहिती देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले होते. याला यश मिळाले असून आज तीन पीडितांनी पोलिसांची भेट घेतली. पोलिसांनी त्यांची ओळख गोपनीय ठेवून संवाद साधला. सुरवातीला पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गुन्हा नोंदवला असला, तरी आता समोर आलेल्या पीडित मुलांच्या स्वतंत्र फिर्यादीवरून नवीन गुन्हे दाखल करण्याबाबत विचार सुरू आहे.

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे आणि विश्वासामुळे भविष्यात आणखीही पीडित मुले व त्यांचे पालक न घाबरता पुढे येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. हा तपास अत्यंत जलदगतीने पूर्ण करून तो फास्ट ट्रॅक कोर्टात नेण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT