नंदुरबार : शहादा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. रायखेड येथे भरधाव स्विफ्ट गाडीने रस्त्यावर उभ्या असलेल्या तरुणाला जोरदार धडक देत त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमप्रकरणातील वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप जखमी तरुणाने पोलिसांत फिर्याद देऊन केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शोएब इदरीस तेली (वय २७, रा. रायखेड, ता. शहादा) हा रायखेड-खेतिया रोडवरील कोचराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मजुरांची वाट पाहत उभा होता. त्याचवेळी अतिक युनुस पठाण (वय २६, रा. रायखेड) याने आपल्या ताब्यातील लाल रंगाच्या स्विफ्ट गाडीने भरधाव वेगात येऊन शोएब याला मागून जबर धडक दिली. या अपघातात शोएबच्या डाव्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली असून दोन्ही हात आणि चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत.
धडक दिल्यानंतर अतिक पठाणने “तुला जिवंत सोडणार नाही” अशी धमकी देत घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. शोएबचा काका अशपाक तेली याने आपल्या बहिणीशी प्रेमविवाह केल्याचा राग अतिक पठाणला होता. त्यातूनच सूडभावनेतून हा खुनाचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.