Fodder Shortage Pudhari
नंदुरबार

Nandurbar News | 'एल-निनो'च्या पार्श्वभूमीवर नंदुरबार प्रशासन सतर्क; चारा सुरक्षा आराखड्याची तयारी सुरू

नंदुरबार मध्ये आवश्यकतेच्या हजार पटीने चारा उपलब्ध

पुढारी वृत्तसेवा

Nandurbar livestock fodder management

नंदुरबार : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी मान्सूनवर 'एल-निनो' (EL-NINO) या हवामान घटकाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात उद्भवू शकणारी संभाव्य चारा टंचाई लक्षात घेता, नंदुरबार जिल्हा प्रशासन आतापासूनच सतर्क झाले आहे. प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी जिल्हयातील पशुधनाच्या संरक्षणासाठी 'जिल्हा चारा सुरक्षा आराखडा' तयार करण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यातील सद्यस्थिती

पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्ह्यात एकूण 3 लाख 78 हजार 271 गाय व म्हैस वर्गीय पशुधन आहे. या पशुधनासाठी प्रतिमाह साधारणपणे 62.25 मेट्रिक टन चारा लागतो. सद्यस्थितीत जिल्ह्यात 8.34 लक्ष मेट्रिक टन चारा उपलब्ध असून सध्या कोणतीही टंचाई नाही. मात्र, पाऊस कमी झाल्यास भविष्यात अडचण येऊ नये म्हणून प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या या आकडेवारीनुसार जिल्ह्यात आवश्यकतेपेक्षा हजार पटीने चारा उपलब आहे.

प्रशासनाचे नियोजन आणि उपाययोजना

संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समिती अंतर्गत नाविन्यपूर्ण योजना आणि आपत्ती निवारण निधीतून चारा बियाणे खरेदीला प्राधान्य देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून खालील पावले उचलली जात आहेत:

• बियाणे वाटप: मका, ज्वारी आणि बाजरी यांसारख्या चारा बियाण्यांची तातडीने खरेदी करून ती शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

• आधुनिक तंत्रज्ञान: हायड्रोपोनिक पद्धतीने चारा उत्पादन, मिनी टिएमआर (TMR) आणि कडबा कुट्टी यंत्रांच्या वाटपावर भर दिला जाणार आहे.

• लागवड मोहीम: धरणांचे गाळपेरा क्षेत्र आणि नदीपात्राशेजारील जमिनीवर चारा लागवडीची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

• मुरघास प्रकल्प: टंचाईच्या काळात हिरवा चारा उपलब्ध राहावा यासाठी मुरघास प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे.

पशुपालकांना आवाहन

जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्याकडील चारा पाऊस, वारा आणि आगीपासून सुरक्षित ठेवावा. चाऱ्याची नासाडी टाळण्यासाठी पशुंना चारा नेहमी कुट्टी करूनच खाऊ घालावा, जेणेकरून उपलब्ध साठा जास्तीत जास्त काळ टिकेल. तसेच नव्याने सुरू झालेल्या ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता’ योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी गोगटे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT